कारला मानवी केसांनी झाकण्यासाठी खर्च केले १५० तास, रचला विश्वविक्रम


स्वतःच्या कारला विविध वस्तूंनी सजवणारे अनेक लोक असतात. मात्र एका इटालियन हेअरस्टायलिस्टने तब्बल 150 तास खर्च करून आपली कार मानवी केसांनी झाकून एक नवीन विश्वविक्रम रचला आहे.

मारिया लुसिया मुगनाने असे या 44 वर्षीय हेअरस्टायलिस्टचे नाव आहे. तिच्या एका मैत्रिणीने 2010 मध्ये तिच्याशी पैज लावली होती, की तिला ते करता येणार नाही. तेव्हा तिने हे करून दाखवायचेच, असा निश्चय केला.

त्यामुळे व्हॅलेंटिनो स्टॅसानो या आपल्या तिच्या सहाय्यकाच्या मदतीने तिने तिची छोटी फिएट 500 ही मोटार केसांनी झाकून टाकली. हे केस भारतातून आयात केले होते, हे उल्लेखनीय.

विशेष म्हणजे तिने केवळ कारचा बाह्य भाग केसांनी झाकला नाही, तर सीट्स, डॅशबोर्ड आणि स्टेअरिंग व्हीलही केसांनी झाकले. केसांच्या या जाड-जाड बटा कारवर शिवण्यासाठी तिला 150 तास लागले. या प्रयत्नामुळे मात्र जगातील सर्वाधिक केसाळ कार म्हणून गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिची वर्णी लागली.

ते पुरेसे नव्हते म्हणून की काय, आता तिने आणखी 20 किलो केस कारला जोडून या वर्षीचा एक नवीन विक्रम केला आहे. हे वाढीव केस फुलपाखराच्या पंखांच्या आकारात असून ते कारवर लावण्यात आले आहेत. ते जगाच्या स्वातंत्र्य आणि शांती यांचे प्रतीक आहेत. मारिया ही केसाळ गाडी घेऊन शहरात फिरते. अन् ती योग्य निगा राखलेली दिसण्यासाठी ती या कारला वारंवार ब्रश करते. नैसर्गिक केसांचे टोप अत्यंत महाग असतात, त्यामुळे ही कार जवळजवळ 100,000 डॉलर किमतीची असल्याचा अंदाज आहे.

Leave a Comment