शालेय जीवनात मुकेश अंबानींच्या मुलांचे किती होते ‘पॉकेट मनी‘ ?


आशियामधील सर्वांत श्रीमंत उद्योगपती म्हणून ओळखले जाणारे मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंबीय त्यांच्या राजेशाही थाटामुळे आणि जीवनशैलीमुळे नेहमीच चर्चेचा आणि आकर्षणाचा विषय ठरत आले आहेत. मुकेश यांच्या पत्नी नीता अंबानी देखील त्यांचा आयपीएल क्रिकेट मधील सहभाग आणि अनेक सामाजिक कल्याणासाठी त्या करीत असलेल्या कामांमुळे ओळखल्या जातात. पण त्या दाम्पत्याची मुले मात्र या प्रसिद्धीपासून काहीशी लांबच असत. त्यांच्या मुलांची छायाचित्रे वर्तमानपत्रांमध्ये फारशी झळकत नसत. अंबानी दाम्पत्याला अनंत, आकाश ही दोन मुले आणि ईशा नावाची एक मुलगी आहे. ही तीनही मुले शाळेत शिकत असताना त्यांना हातखर्चाला किती पैसे, म्हणजेच किती पॉकेट मनी मिळत असे, ह्याचा उलगडा स्वतः नीता अंबानी यांनी केला.

‘idiva’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीता म्हणाल्या की मुले शाळेत जात असत तेव्हा दर शुक्रवारी नीता त्यांना पाच रुपये देत असत. मुलांच्या या पॉकेटमनी बद्दल मुलांचे मित्र त्यांची थट्टा देखील करीत असल्याचे नीता म्हणाल्या. पण या बद्दल नीता यांना कधीही कमीपणा वाटला नाही. मुकेश अंबानी खासगी खर्चाच्या बाबतीत अतिशय काटेकोर आहेत, आणि त्यांची हीच सवय मुलांमधेही बाणावी अशी आपली इच्छा असल्याचे नीता म्हणाल्या. त्यामुळे त्यांचे घराणे श्रीमंतांचे आहे ही जाणीव नीता यांनी कधीही आपल्या मुलांना होऊ दिली नाही.

आता मुकेश अंबानी यांची तीनही मुले त्यांच्या व्यवसायात लक्ष घालू लागली आहेत. त्यामुळे लहानपणी प्रसिद्धीच्या झोतापासून लांब असलेले हे तिघे जण आता काही ना काही कारणांनी चर्चेचा विषय बनत असतात.

Leave a Comment