पहिल्यांदाच ‘डेट’वर जाताय? मग या गोष्टी लक्षात घ्या


आजकालच्या आधुनिक विचारांच्या समाजामध्ये ‘ डेटिंग ‘ ची पद्धत रूढ होत चालली आहे. अगदी नुकत्याच वयात आलेल्या तरुण तरुणींपासून ते प्रौढ महिला आणि पुरुषांपर्यंत सर्वांनाच ‘ डेटिंग ‘ द्वारे गाठभेट घेण्याची पद्धत रुचत आहे. पहिल्यांदाच डेट वर जाणाऱ्या व्यक्तींच्या मनामध्ये थोडी अस्वस्थता असणे साहजिक आहे. पहिली ‘ डेट ‘ ही प्रत्येकासाठी अतिशय महत्वाची असल्याने, आपली डेट यशस्वी व्हावी, आपल्याला आणि ज्याला आपण डेट करीत असाल, त्या जोडीदाराला या भेटीतून आनंद मिळावा असे प्रत्येकालाच वाटत असते. त्यामुळे पहिल्यांदाच डेट वर जाताना काही गोष्टींचा विचार करावयास हवा. त्यामुळे बहुतेक वेळा तरूण तरुणी आपल्या अनुभवी मित्र मैत्रिणींचा सल्ला घेताना दिसतात.

पहिल्या डेटच्या आठवणी नेहमीच खास असतात, त्यामुळे ह्या डेटसाठी निवडलेली जागा देखील खासच असायला हवी, नाही का? अशी अनेक रेस्टॉरंट किंवा कॅफे आहेत, जिथे तुम्ही तुमच्या डेटची पूर्वसूचना देऊन काही पूर्वतयारी करू शकता. कॅण्डललाईट डिनरची कल्पना देखील पहिल्या डेट साठी चांगली आहे. खूप गर्दी, गाजावाजा असलेल्या ठिकाणी जाण्याचे टाळा, त्याचबरोबर अगदी निर्मनुष्य ठीकाणी जाणेही टाळा. ठिकाण असे हवे, की जिथे तुम्हाला निवांत बसून, मनमोकळेपणाने बोलता येईल.

डेटसाठी भेटल्यानंतर आपल्या पार्टनरशी आपण काय बोलावे याचे सल्ले मित्र मैत्रिणींकडून घेतले जातात. असे न करता, तुम्हाला ज्या विषयांमध्ये रुची आहे, त्या विषयांबद्दल बोला, आपल्या पार्टनरच्या आवडीनिवडी जाणून घेता येईल अश्या प्रकारचे संभाषण ठेवा. पहिल्याच डेटवर फार व्यक्तिगत स्वरूपाचे प्रश्न विचाराणे आवर्जून टाळायला हवे. तसेच आपल्याबद्दल बोलताना देखील फार व्यक्तिगत माहिती पहिल्याच डेटवर देण्याचे टाळावे.

संभाषणामध्ये आपल्या पार्टनरला ही सहभागी करून घ्या, कित्येक व्यक्ती उत्साहाच्या भरामध्ये स्वतःच बोलत राहतात. असे न करता, स्वतःवर नियंत्रण ठेवा आणि आपल्या जोडीदारालाही बोलण्याची, आपले विचार मांडण्याची संधी द्या. जर जोडीदाराची मते पटली नाहीत, किंवा तुमची मते जोडीदाराला पटली नाहीत, तर त्या विषयाचा फार आग्रह न धरता विषय बदला. ही तुमची ‘डेट’ असून, वादविवाद स्पर्धा नाही याचा विसर पडू देऊ नका.

पहिल्यांदाच डेटसाठी भेटणाऱ्या व्यक्तींकडे बोलण्यासाठी फारसे विषय नसतात, त्यामुळे सर्वसाधारणपणे सर्वांचीच रुची असेल असे विषय बोलण्यासाठी निवडा. संगीत, सध्या गाजत असलेले चित्रपट, पुस्तके, फिरण्यासाठी नवनवीन ठिकाणे, रेस्टॉरंट, आवडते कॅफे, इत्यादी विषय निवडा. एकदा का संभाषणाचे सूर जुळले, की गप्पा देखील रंगतातच. आणि गप्पा रंगल्या की दोन्ही व्यक्तींना परस्परांचा सहवास देखील आवडू लागतो.

Leave a Comment