येथे तयार केल्या जातात भावी सौंदर्यवती


मिस वर्ल्ड २१०७ हा खिताब नुकताच भारताच्या मानुषी छिल्लर हिने मिळविला आहे, त्यामुळे भारताने सर्वात जास्त ब्युटी क्वीन्स जगाला देऊन, वेनेझुएला या देशाची बरोबरी केली आहे. आजवर जागतिक सौंदर्य स्पर्धांमध्ये सर्वात जास्त विजेत्या वेनेझुएला या देशाने दिल्या होत्या. वेनेझुएला हा देश नैसर्गिक तेलाच्या मुबलक प्रमाणात असलेल्या खाणींसाठी जसा ओळखला जातो, त्याचप्रमाणे सौंदर्यस्पर्धांसाठी देखील हा देश ओळखला जातो. या देशाच्या बावीस सौंदर्यवती तरुणी आजवर निरनिराळ्या जागतिक पातळीवरील सौंदर्यस्पर्धांमध्ये विजेत्या ठरल्या आहेत. आजवर वेनेझुएलामधील युवतींनी सहा मिस वर्ल्ड, सात मिस युनिव्हर्स, सात मिस इंटरनॅशनल, आणि दोन मिस अर्थ हे खिताब जिंकले आहेत. या सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेण्याकरिता इथल्या सौंदर्यवतींना कशी तयारी करावी लागते, हे समजल्यानंतर आपल्याला ही धक्का बसल्यावाचून राहणार नाही.

वेनेझुएलामधील प्रत्येक तरुणीची इच्छा कोणत्या ना कोणत्या सौंदर्य स्पर्धेत भाग घेण्याची असतेच. त्यासाठी त्या वाटेल करण्यासाठी तयार असतात. या तयारीची पहिली पायरी म्हणून या मुलींना अगदी कमी वयापासूनच मॉडेलिंगच्या जगामध्ये पदार्पण करावे लागते. कित्येक मुलींना अगदी बारा वर्षांच्या वयातच नोज सर्जरी किंवा बट लिफ्ट सारख्या कॉसमेटिक सर्जरी करवून घ्याव्या लागतात. वयाच्या सोळाव्या वर्षी कित्येक तरुणी ब्रेस्ट इम्प्लांट देखील करविताना इथे मोठ्या प्रमाणावर आढळतात. आपल्या मुलीने सौंदर्य स्पर्धेमध्ये विजेती ठरले पाहिजे अशी महत्वाकांक्षा असणारे पालक, आपल्या आठ नऊ वर्षांच्या मुलींना देखील इंजेक्शनद्वारे होर्मोन्स देऊन, लवकर मोठ्या होण्यास भाग पाडतात. तसेच आहार, व्यायाम इत्यादींबद्दलचे नियम ही फारच काटेकोर असतात.

वेनेझुएलामधील मुली दिसायला जास्तच सुंदर असल्या तरी इथे नैसर्गिक सौंदर्याला फारसा वाव नाही. त्यामुळे सतत शरीरावर कोणत्या ना कोणत्या गोष्टीसाठी कॉसमेटिक सर्जरी करून घेणे इथे फारच सामान्य बाब समजली जाते. २०१३ साली जागतिक सौंदर्य स्पर्धेमध्ये विजेती ठरलेल्या एका सौन्दर्यवतीने, आपल्याला अन्नाचा मोह होऊ नये म्हणून जिभेची शस्त्रक्रिया करून घेतल्याचे कबूल केले होते.

येथे कॉसमेटिक सर्जरी करणाऱ्या क्लिनिक्स ची रेलचेल आहे, तसेच फिनिशिंग स्कूल्स ची ही भरमार आहे. कसे उठावे, कसे बसावे, कसे चालावे इथपासून लोकांशी संभाषण कसे साधावे इथपर्यंत सर्व गोष्टी या फिनिशिंग स्कूल्समध्ये शिकविल्या जातात. फिनिशिंग स्कूलमध्ये जाणे हा इथल्या सौन्दर्यवतींच्या जीवनाचा अविभाज्य भाग असल्याने येथील सौंदर्यवती जागतिक पातळीवर नेहमी अग्रसर असतात, असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे.

Leave a Comment