रात्रीच्या शांत निद्रेकरिता झोपण्याआधी घ्या असा आहार


दिवसभराची कामाची दगदग, धावपळ ओसरल्यानंतर माणसाला एका गोष्टीची आवर्जून गरज असते. ती गोष्ट म्हणजे रात्रीची शांत झोप. जर शारीरिक कष्ट जास्त झाले, किंवा मनासिक तणाव असले, तर झोप येण्यास त्रास होतो. पण काही व्यक्तींच्या बाबतीत सर्व काही आलबेल असून देखील त्यांना रात्री शांत झोप लागत नाही, किंवा वारंवार झोपमोड होत असते. अश्या वेळेला ही तक्रार बहुतेक वेळेला आपल्या आहाराशी निगडीत असते. आपण रात्री घेतलेला आहार आपल्या झोपेसाठी फार महत्वाचा असतो. त्यामुळे रात्रीचा आहार जर झोपेसाठी पूरक असेल, तर रात्री शांत झोप न लागण्याची तक्रार दूर होऊ शकते.

रात्री झोपण्याआधी केळ्याचे सेवन करावे. केळ्यामध्ये कर्बोदके भरपूर मात्रेमध्ये असतात. या कर्बोदकांमुळे मेंदूमध्ये ट्रीप्टोफॅन तयार होते, ज्यामुळे आपल्याला चांगली झोप लागते. याशिवाय केळ्यामध्ये असलेल्या मॅग्नेशीयम मुळे शरीरातील स्नायू आणि नर्व्हज् चा तणाव दूर होऊन शरीर तणावमुक्त होते.

दुधामध्येही ट्रीप्टोफॅन बनविणारे घटक आहेत. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दुधाचे सेवन शांत झोप येण्यास मदत करू शकते. आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपल्या दिवसाचा शेवट एक ग्लास गरम दुधाने करावयास हवा. दुधामध्ये मेंदूला शांत करणारी तत्वे असून, या मध्ये कॅल्शियमदेखील मोठ्या प्रमाणामध्ये असते. यामुळे शांत झोप येते.

रात्री झोपण्यापूर्वी मधाचे सेवन हा, शांत झोप येण्याकरिता चांगला उपाय समजला जातो. मधाच्या सेवनाने देखील शरीरामध्ये ट्रीप्टोफॅन तयार होत असते. त्याशिवाय मधात अँटी फंगल, अँटी बॅक्टेरियल घटक असल्याने, ते शरीराच्या आरोग्यासाठी गुणकारी आहे. त्याचबरोबर रात्री बदामाचे सेवन करणे ही चांगले. बदामामध्ये असणारे अमिनो अॅसिड्स आणि मॅग्नेशियम शारीरिक तणाव दूर करण्यास मदत करतात. त्यामुळे रात्री झोपण्याआधी एक गल्स गरम दुधासोबत बदाम खावेत.

गव्हाचा भरडा किंवा दलिया हा एकप्रकारे परिपूर्ण आहार मानला गेला आहे. दलियामध्ये शरीराला आवश्यक ती पोषक द्रव्ये आहेतच, शिवाय दलिया पचण्यास अतिशय हलका असल्याने रात्री खाण्यासाठी उत्तम पर्याय आहे. दूध, केळे, किंवा मध घालून दलिया खाल्ल्यास रात्री शांत झोप लागते. ज्यांना रात्रीचे जेवण पचत नाही, अश्या व्यक्तींनी रात्री इतर कोणतेही पदार्थ न खाता केवळ दलिया खाण्याचा पर्याय निवडावा.

रात्री झोप चांगली येण्यासाठी आहारावर लक्ष देणे आवश्यक आहेच पण याशिवाय इतरही काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. रात्री झोपण्यापूर्वी मद्यपान करू नये. मसालेदार, तेलकट पदार्थ शक्यतो टाळावेत. तसेच कॅफिनयुक्त पदार्थ देखील टाळायला हवेत.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment