जॉर्जियामध्ये सापडली ८००० वर्षं जुनी वाईन


दारू जितकी जुनी तितकी चांगली आणि तितकीच महागही असते असे म्हटले जाते. ८००० वर्षं जुनी मातीची भांडी आता जॉर्जियाची राजधानी टिबिलिसी येथे शास्त्रज्ञांना सापडली असून त्यात त्यांना वाईनचे काही शिल्लक अवशेष मिळाले आहेत.

यापूर्वी इराणमध्ये दारू बनवण्यासाठी वापरण्यात आलेली ७००० वर्षं जुनी भांडी सापडली होती. वाईनच्या अस्तित्वाचे ते सर्वांत जुने पुरावे मानले जायचे. जॉर्जियामध्ये सापडलेल्या काही भांड्यांवर द्राक्षांची तर काहींवर नृत्य करणाऱ्या पुरुषांचे चित्र रेखाटण्यात आली आहेत. यावर प्रोसिडिंग्ज ऑफ नॅशनल अॅकडमी ऑफ सायन्सच्या जर्नलमध्ये एक शोधनिबंधात लिहिण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना टोरंटो विद्यापीठातले संशोधक स्टीफन बाटिउक म्हणाले, केवळ वाईन बनवण्यासाठी जंगली युरेशियन द्राक्षांचा वापर होत असल्याचा हा सर्वांत जुना पुरावा असावा. आजच्या प्रमाणे तेव्हाही वाईन पाश्चात्त्य संस्कृतीच्या केंद्रस्थानी असावी. धार्मिक पंथ, औषधशास्त्र, अन्नपदार्थ, अर्थव्यवस्था आणि समाजांमध्येही वाईनला प्राचीन संस्कृतीत बरच महत्त्व असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टिबिलिसी शहराच्या ३० किमी दक्षिणेस गडच्रिली गोरा आणि शुलावेरिस गोरा गावांमध्ये निओलिथिक काळातील ही भांडी सापडली आहेत. आठ भांड्यात वाईनचा पुरावा दाखवणारी रसायन सापडली आहेत. यातील सर्वांत जुने भांडे ख्रिस्तपूर्व ५९८० सालच्या आसपासच्या काळातील आहे. या संशोधनात सहकार्य करणारे जॉर्जियन नॅशनल म्युझियमचे संचालक डेव्हिड लॉर्डिकपॅंडीझ सांगतात, मोठ्या भांड्यांना क्वेवरी म्हटले जाते आणि आजही वाईन बनवण्यासाठी जॉर्जियात अशी मोठी भांडी वापरली जातात. जॉर्जियात सापडलेल्या या भांड्यांवर द्राक्षांची नक्षी आहे.

आता ज्या पद्धतीने वाईन बनवली जाते, तशीच ती त्या काळातही बनवली जात असावी असे टोरंटो विद्यापीठाचे बाटिउक यांनी म्हटले आहे. वाईन बनवण्याचे इराणच्या झॅगरॉस पर्वतांत ख्रिस्तपूर्व ५४०० ते ५००० या काळातील पुरावे सापडले आहेत. वाईन निर्मितीचा हा आतापर्यंतचा सर्वांत जुना पुरावा आहे. अर्मेनियाच्या गुहेत २०११मध्ये वाईन बनवण्याची ६००० वर्षं जुनी भांडी सापडली आहेत. जगातील द्राक्षरहित वाईन निर्मितीचा सर्वांत जुना पुरावा चीनमधील असून, ते ख्रिस्तपूर्व ७००० काळातील आहे. भात, मध आणि फळांपासून ही वाईन बनवली जात होती.

Leave a Comment