आगळ्या वेगळ्या पद्धतीने पिचाईंनी साजरा केला गुगल मॅप्सचा 15वा वाढदिवस

गुगल मॅप्सला काल 15 वर्ष पुर्ण झाली. या निमित्ताने गुगल आणि अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मॅपिंग सेवेचा उपयोग करून जगभरातील आपल्या आवडीच्या वेजी बुरिटो रेस्टोरंट्सची एक यादी शेअर केली. सोशल मीडियावर शेअर केलेल्या या यादीमध्ये मुंबई, न्युयॉर्क, लंडन, हेलसिंकी, पॅरिस, डबलिन अशा अनेक रेस्टोरेंट्सचा समावेश आहे.

सुंदर पिचाई यांनी इंस्टाग्रामवर आपल्या आवडत्या वेजी बुरिटो रेस्टोरंट्सची यादी गुगल मॅपसोबत शेअर केली. पोस्ट शेअर करताना त्यांनी लिहिले की, जगभरातील माझ्या आवडत्या वेजी बुरिटो रेस्टोरंट्सची मी यादी तयार केली आहे. प्रवासात असताना माझे हे आरामदायी जेवण असते. जेव्हा एखादे चांगले सापडते, तेव्हा मी उत्साही होतो.

शेअर केलेल्या यादीनुसार, पिचाई जेव्हा मुंबईत असतात तेव्हा त्यांना आपले हे खास मॅक्सिन फूड खाण्यासाठी सांताक्रूज पुर्व येथील न्यूयॉर्क बुरिटो कंपनी हे ठिकाण आवडते. लंडनमध्ये टॉर्टिला किंग्स क्रॉस आणि सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये पॅन्झॉन हे त्यांचे आवडते ठिकाण आहे.

गुगल मॅप्सला 15 वर्ष झाली या निमित्ताने पिचाई यांनी आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये देखील गुगल मॅप्सच्या सेवा आणि आपल्या अनुभवांबद्दल सांगितले. यावेळी त्यांनी आपले भारतातील अनुभव देखील शेअर केले.

भारतातील गुगल मॅप्स वापराबद्दलचा पहिला अनुभव शेअर करताना त्यांनी लिहिले की, मी पहाटे पहाटे मुंबईला पोहचलो व मित्राच्या घरी जाण्यासाठी कॅब घेतली. मात्र त्याचे घर शोधणे अवघड होते. त्यावेळी गुगल मॅप्सचा वापर करत मी कोणालाही न विचारता ड्रायव्हरला प्रत्येक वळणाची माहिती देत होतो. यामुळे मी खूपच उत्साही झालो. मात्र माझ्या ड्रायव्हरला काहीही लक्षात येत नव्हते.

Leave a Comment