आता उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर आधारित बायोपिक तुमच्या भेटीला


न्यायप्रणालीचा वकील हा एक महत्वाचा चेहरा असतो. त्यातच आपल्या सर्वांच्या ओळखीचे प्रख्यात विधीतज्ज्ञ आणि सरकारी वकील उज्ज्वल निकम यांच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती करण्यात येणार असून या चित्रपटाचे दिग्दर्शन ‘ओह माय गॉड’ चित्रपटाचे दिग्दर्शक उमेश शुक्ला हे करणार आहेत. या बायोपिकचे ‘निकम’ असे नाव असणार आहे.

उज्वल निकम यांच्या कारकिर्दीमधील महत्त्वाच्या घडामोडी ‘निकम’ या बायोपिकमध्ये दाखवण्यात येणार आहेत. या चित्रपटाची उमेश शुक्ला यांच्यासोबतच सेजल शाह, आशिष वाघ, गौरव शुक्ला आणि भावेश मंडलिया हे निर्मिती करणार आहेत.

उज्ज्वल निकम या बायोपिकबाबत बोलताना म्हणाले, की मला माझ्या आयुष्यावर पुस्तक किंवा चित्रपट तयार करण्यासाठी मागील बऱ्याच दिवसांपासून विचारणा करण्यात येत होती. मी याबद्दल आश्वासक नव्हतो. कारण, माझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे. पण, अखेर मी प्रतिभाशाली टीमसोबत जुळून या बायोपिकसाठी तयार झालो. या टीमवर मला विश्वास आहे. ते या बायोपिकला योग्य तो न्याय देतील.

आत्तापर्यंत बरेच कठीण खटले उज्ज्वल निकम यांनी लढले असून आहेत. ते २६/११ च्या खटल्यादरम्यान चर्चेत आले होते. त्यांनी दहशतवादी अजमल कसाबच्या खटल्यात सरकारी वकील म्हणून काम पाहिले. त्यांनी बहुचर्चित खटल्यांमध्ये महत्त्वाची कामगिरी बजावली. यामध्ये त्यांची १९९३ साली झालेल्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणी विशेष सरकारी वकील पदावर नेमणूक झाली. त्यांच्या यशस्वी कारकीर्दीची ही सुरुवात होती. त्यानंतर त्यांनी गुलशन कुमार हत्याकांड, प्रमोद महाजन हत्या इत्यादी खटलेही लढले आहेत. आपल्या ३० वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी ६२८ गुन्हेगारांना जन्मठेप आणि ३७ गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळवून दिली आहे.

उज्ज्वल निकम हे असे एकमेव वकील आहेत ज्यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. लवकरच त्यांच्यावर आधारित ‘निकम’ या बायोपिकच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. यामध्ये कोणते कलाकार भूमिका साकारणार आहेत हे अद्याप गुलदस्त्यात आहे.

Leave a Comment