दुबईतील सर्वात मोठी थ्रीडी प्रिंटेड इमारत


फोटो सौजन्य भास्कर
दुबईतील सर्वात मोठी थ्रीडी प्रिंटेड इमारत पूर्ण झाली असून ती लोकांना बघण्यासाठी खुली केली गेली आहे. ६९०० चौ, फुटाच्या या दुमजली इमारतीत दुबई नगरपालिकेचे कार्यालय आहे. २०३० पर्यंत दुबईत २५ टक्के इमारती थ्रीडी तंत्राने बांधल्या जाणार आहेत, ही इमारत त्याचाच एक भाग आहे. ही इमारत बांधण्यासाठी नेहमीच्या बांधकामाच्या तुलनेत ९० टक्के कमी खर्च आला तर मजुरीचा खर्च ७० टक्के कमी झाला असे सांगितले जात आहे.

ही इमारत बोस्टन येथील एपिस कोर या कंपनीने डिझाईन केली असून त्यात तयार कॉंक्रीट फौंडेशन, वेगाने सुकणारे सिमेंट आणि जिप्सम यांचा वापर केला गेला आहे. सामान्य बांधकामाच्या तुलनेत या इमारती अधिक मजबूत आणि कमी खर्चात आणि कमी वेळात बांधता येतात. भिंती बनविल्यावर मग त्या कापून त्यात खिडक्या बसविल्या जातात.

जगातील सर्वात उंच थ्रीडी प्रिंटिंग तंत्राने बांधलेली इमारत चीनच्या शुजा मध्ये असून तिची उंची ९० फुट आहे. ही पाच मजली इमारत आहे. थ्रीडी प्रिंटिंग तंत्राचा शोध सर्वप्रथम १९८० मध्ये इंजिनिअर हुक चूल यांनी लावला. एपिसकोर कंपनीचे सीईओ निकिता चेनियुताई म्हणाले, हे तंत्र अधिक सुलभ करण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. त्यांचा पुढचा प्रकल्प लुजीयाना आणि कॅलिफोर्निया येथे सुरु होत आहे. कंपनीने ५०० चौरस फुटाचे राहण्यायोग्य घर २४ तासात बांधण्याचे ध्येय ठेवले असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment