भ्रामक जाहिराती दाखवल्यास 50 लाख दंड आणि 5 वर्षांची शिक्षा

आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ड्रग्स अँड मॅजिक रेमेडिज (आपत्तीजनक जाहिराती कायदा, 1954) च्या विधेयकाचा एक सुधारित मसुदा तयार केला आहे. यानुसार, जादूयी उपाय अर्थात त्वरित गोरेपणा, लैंगिक क्षमता वाढवणे, महिलेच्या वांझपणावर उपचार, तरुण दिसण्यासाठी उपाय, केस पांढरे होण्यापासून रोखणे, लठ्ठपणा अशा विषयी औषधांच्या भ्रामक आणि खोट्या जाहिराती देणाऱ्यांना  5 वर्षांचा कारावास आणि 50 लाखांपर्यंतचा दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मसूद्यामध्ये अशा 78 आजार, विकार आणि परिस्थितीचा उल्लेख आहे, ज्यांचा उल्लेख जाहिरातीमध्ये करता येणार नाही.

सध्याच्या कायद्यानुसार, अशा गुन्ह्यात पहिल्यांदा दोषी आढळल्यास सहा महिन्याचा कारावास आणि दंड अथवा दोन्हीची तरतूद आहे. दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास एक वर्ष कारावास आणि दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते.

मात्र नवीन संशोधित मसुद्यामध्ये दंडाची शिक्षा वाढवण्यात आली आहे. यानुसार, पहिल्यांदा दोषी आढळल्यास 2 वर्ष आणि 10 लाख रुपये दंड आणि दुसऱ्यांदा दोषी आढळल्यास 50 लाख रुपये दंड आणि 5 वर्षांच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.

मंत्रालयानुसार, बदलते तंत्रज्ञान आणि वेळेनुसार या मसुद्यात बदल करण्यात आले आहेत. काही सुचना अथवा तक्रारी असल्यास 45 दिवसांच्या आत पाठवण्याचे देखील आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Comment