घोड्याच्या नावामुळे ऑलिम्पिकमध्ये पाक घोडेस्वार अडचणीत?


पाकिस्तान मधून टोक्यो ऑलिम्पिक साठी क्वालिफाय झालेला एकमेव घोडेस्वार उस्मान खान त्याच्या घोड्याच्या नावामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उस्मानने सिंगल इक्वेस्ट्रीन स्पर्धेत क्वालिफाय केले आहे. त्याच्या घोड्याचे नाव आझाद काश्मीर असे असून या नावाला भारतीय ऑलिम्पिक संघटना हरकत घेण्याचा विचार करत आहे.

इंटरनॅशनल इक्वेस्ट्रीयन फेडरेशनच्या माहितीनुसार उस्मानने गेल्या एप्रिल मध्ये ऑस्ट्रेलियातून १२ वर्षाचा घोडा खरेदी केला असून त्याचे नाव बदलून आझाद काश्मीर असे ठेवले आहे. भारतातर्फे या स्पर्धेसाठी फवाद खानने क्वालिफाय केले आहे. ऑलिम्पिक चार्टरच्या नियम ५० नुसार ऑलिम्पिक खेळात स्थळ वा अन्य कोणत्याही राजकीय, धार्मिक, जातीय प्रचाराला परवानगी नाही. हा नियम खेळातील निष्पक्षतेशी संबंधित आहे. त्यामुळे उस्मानच्या घोड्याच्या नावाविरोधात भारतीय ऑलिम्पिक संघटना हरकत घेऊ शकते.

पाकिस्तान ज्या भागाचा उल्लेख आझाद काश्मीर असा करतो त्याला भारत पाकव्याप्त काश्मीर असे म्हणतो. भारतीय ऑलिम्पिक संघटनेची उस्मानच्या घोड्याच्या नावाविरोधातली तक्रार दाखल झाली तर पाकिस्तानचा ऑलिम्पिक कोटा जाऊ शकतो असेही समजते.

Leave a Comment