ऑस्ट्रेलियातील भयंकर वणव्यातून जगल्या गोगलगाई


फोटो सौजन्य भास्कर
जुलै २०१९ ते जानेवारी २०२० या काळात ऑस्ट्रेलियात पेटलेल्या जंगल वणव्यात किती माणसे, किती प्राणी, किती किडे कीटक आणि घरे जळली याची माहिती अजूनही पुढे येत असतानाच या धुमसत्या वणव्यात लाल रंगाच्या गोगलगाई बचावल्या असल्याचे आढळून आले आहे. न्यू साउथ वेल्सच्या कोपुटर पर्वतात या लाल रंगाच्या गोगलगाई सापडतात आणि जगभरात त्या फक्त या एकाच ठिकाणी आढळतात. या गोगलगाइच्या तीन प्रजाती असून त्या सर्व मांसाहारी आहेत. विशेष म्हणजे केपूटर पर्वत भागात १८ हजार हेक्टर जंगल आगीच्या तडाख्यात सापडून बेचिराख झाले आहे.

लाल रंगाच्या या गोगलगाई सर्वप्रथम २०१३ मध्ये आढळल्या होत्या. त्यांची लांबी सरासरी २० सेंटीमीटर असते. या गोगलगाई खडकातील फटी आणि जळलेल्या झाडांच्या बेचक्यात नॅशनल पार्क व वाईल्ड सर्व्हिस रेंजर्सना सुमारे ६० ठिकाणी दिसल्या. त्यांचे अन्न जळून गेले आहे मात्र तरीही त्या जिवंत राहिल्या आहेत. या जंगलातील ९० टक्के जीवजंतू आगीच्या भक्षस्थानी पडले आहेत.

पर्यावरण आणि उर्जा विभागाच्या आकडेवारीनुसार या आगीत ४० टक्के जीवजंतू आणि ८० टक्के वस्तीस्थाने जळून खाक झाली आहेत. २२ माणसे मेली आहेत तर दोन हजाराहून अधिक घरे जळली आहेत. ६५ टक्के प्रजातींच्या निवासस्थानवर अजूनही संकट आहे. झाडांच्या १६ प्रजाती, १४ प्रकारचे बेडूक, ९ जातींचे पक्षी, ७ प्रकारचे सरपटणारे प्राणी, ४ प्रकारचे किडे, ४ प्रकारचे मासे व १ प्रकारचा कोळी नष्ट झाले आहेत. या आगीमुळे कोआला या प्राण्याचे मोठे नुकसान झाले असून ८ हजार कोआला व ३० हजार कांगारू आगीचे भक्ष्य ठरले आहेत.

Leave a Comment