अब्जाधीश बिल गेट्स घासतात घरातली खरकटी भांडी


फोटो सौजन्य डेली मेल
अब्जावधीची कमाई असणाऱ्या कुणाही अतिश्रीमंताच्या घरादारात नोकरांचा ताफा असणे यात नवलाची बाब नाही. पण एखादा जगन्मान्य अब्जाधीश रात्रीच्या जेवणाची घरातली खरकटी भांडी स्वतः स्वच्छ करतो ही नक्कीच नवलाची बाब आहे. आणि त्यातही विशेष म्हणजे हा अब्जाधीश अन्य कुणी नाही तर मायक्रोसॉफ्ट या कंपनीचा जनक आणि हजारो लोकांच्या पोटापाण्याची सोय लावणारा म्हणजे त्यांना नोकरी देणारा आहे. होय बिल गेट्स यांनी स्वतःच एका मुलाखतील गेली २५ वर्षे रात्रीच्या जेवणाची खरकटी भांडी ते स्वतः धुतात आणि त्यात त्यांना पत्नी मेलिंडा मदत करते असे एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे.

बिल म्हणाले आमच्याकडे नोकर आहेत पण रात्रीच्या जेवणाची भांडी मी कधीच नोकरांना धुवायला सांगत नाही. हे काम गेली २५ वर्षे मीच करतो आणि पत्नी मला त्यात मदत करते. या कामासाठी १५-२० मिनिटे लागतात आणि हाच वेळ आम्हा दोघांना एकमेकांशी मनमोकळा संवाद साधण्यास उपयोगी पडतो. आमचा हा वेळ हलक्याफुलक्या आणि मनाला आनंद देणाऱ्या गप्पात कसा सरतो हे कळतही नाही.

बिल यांचा रोजचा दिवस अतिशय धकाधकीचा असतो. सतत देशविदेशात प्रवास, मुलाखती, चर्चा, व्यवसाय निर्णय यांची एकच गडबड असते तरीही बिल रोज वेळातवेळ काढून व्यायाम करतात, शक्य असेल तेव्हा टेनिस खेळतात असेही त्यांनी आवर्जून सांगितले. बिल यांची संपत्ती ९८.९ अब्ज डॉलर्स असून ते जगातील दोन नंबरचे श्रीमंत व्यक्ती आहेत.

Leave a Comment