प्रवासादरम्यान उलट्यांचा त्रास रोखण्यासाठी करा हे उपाय


कित्येक व्यक्तींना प्रवास करताना मळमळते किंवा उलट्या होतात. या तक्रारींमुळे प्रवासाची मजा लुटण्याचा विचारही या व्यक्ती करू शकत नाहीत. आपल्याला या तक्रारी जाणवतील या भीतीने अनेकजण तर मुळातच प्रवासालाच अजिबात फाटा देत असतात. काही व्यक्ती मळमळू नये किंवा उलट्या होऊ नये म्हणून पूर्ण लंघन करीत असतात. प्रवासासाठी डोंगराळ भागात न जाण्यापासून ते नानाविध औषधे घेणे असे अनेक उपाय ह्या व्यक्ती करताना दिसत असतात. पण प्रवास ही अजिबात टाळता येतोच असे नाही. काही ना काही कारणाने, कुठल्या ना कुठल्या वेळी, प्रवास करावाच लागतो. त्यामुळे ज्यांना प्रवासामध्ये मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होत असेल, अश्यांनी काही उपाय केल्याने हा त्रास होणार नाही.

एक कप गरम पाण्यामध्ये थोडीशी दालचिनी घालावी आणि चवीनुसार थोडेसे मध घालावे. हा काढा घरातून प्रवासाला बाहेर पडण्यापूर्वी प्यावा. जर प्रवास लांबचा असेल, तर हा काढा थर्मासमध्ये भरून घ्यावा आणि प्रवासादरम्यान थोड्या थोड्या वेळाने पीत रहावा. तसेच घराच्या बाहेर प्रवासासाठी निघताना तोंडामध्ये बडीशेप ठेऊन ती चघळावी. प्रवास करीत असताना आपल्याबरोबर बडीशेप नेहमी ठेवावी. बडीशेपेमुळे मळमळल्याची भावना होत नाही.

एक कप गरम पाण्यामध्ये दोन लहान चमचे अॅपल सायडर व्हिनेगर घालून ते पाणी प्यावे. त्यामुळे ही मळमळ होत नाही. तसेच पुदिन्याची पाने चावून खाल्ल्यास किंवा पुदिन्याची पाने उकळून ते पाणी प्यायल्यासही उलट्या होत नाहीत. आल्याचा तुकडा चघळून खाल्ल्यास किंवा आले घालून बिन दुधाचा चहा प्यायल्यास ही उलट्यांचा त्रास कमी होतो.

प्रवासाला निघताना आपल्या जवळ नेहमी एखादे लिंबू ठेवावे. उलट्या होण्याची भावना झाल्यास किंवा मळमळत असल्यास लिंबाची फोड चघळावी, किंवा लिंबू सरबत घ्यावे. त्यामुळे मळमळ कमी होईल. उलट्यांच्या त्रासापासून बचाव म्हणून एक कप कोमट पाण्यामध्ये पाव लहान चमचा जीऱ्याची पूड घालून हे पाणी प्यावे. त्यामुळे उलट्यांचा त्रास होणार नाही.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment