दक्षिणात्य सुपरस्टारच्या घरी आयकर विभागाला सापडले 65 कोटी रुपये


बंगळुरु : आयकर विभागाने दक्षिणात्य सुपरस्टार विजयच्या घरावर धाड टाकली असून आयकर चोरीचा सुपरस्टार विजयवर आरोप असल्यामुळेच आयकर विभागाची त्याच्यावर वक्रदृष्टी पडली. विजयच्या घरावर आयकराची धाड पडली त्यावेळी तामिळनाडूतील नेयवली कोळसा खाणीत विजय त्याच्या आगामी चित्रपटाचे चित्रीकरण करत होता. पण विजयला या छापेमारीमुळे शूटिंग अर्धवट सोडून घरी परतावे लागले.


एजीएस एंटरप्रायजेस या कंपनीवरील छापेमारीदरम्यान, सुपरस्टार विजयला बिजली या चित्रपटासाठी दिलेल्या पैशांवरुन गडबड झाल्याचे आढळले. आयकर विभागाने त्याबाबत अधिक चौकशी केली. आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटासाठी विजयला मोठी रक्कम मिळाल्याची कुणकुण आधीच आयकर विभागाला लागली होती.

त्याआधी विजयच्या फायनान्सरच्या घरातून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी पैशाच्या बॅग जप्त केल्या. काल 5 फेब्रुवारीला विजयच्या शालीग्राम आणि पनैयूर येथील घरांवर आयकर विभागाने धाडी टाकल्या. त्या धाडी आज पुन्हा सुरु केल्या. विजयच्या घरी इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची बातमी जसी पसरली, तसे सोशल मीडियावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत असून त्याच्या समर्थनार्थ #WestandwithVijay हा हॅशटॅग ट्रेंड झाला. विजय करचोरी करु शकत नाही, असा दावा त्याचे चाहते करत आहेत.

Leave a Comment