अनावश्यक त्रास देणाऱ्या व्हिडिओ जाहिराती हटविणार गुगल


नवी दिल्ली – ग्राहकांना अनावश्यक त्रास देणाऱ्या व्हिडिओ जाहिराती गुगल क्रोम ब्राऊजर आणि युट्यूबवरून हटविण्यात येणार असल्याची माहिती गुगलचे प्रॉडक्ट मॅनेजर जेसन जेम्स यांनी दिली. नवी नियमावली व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जाहिरातींच्या दर्जासंदर्भात तयार करण्यात आली आहे. येत्या काळात वेबसाईटवर याच नियमावलीनुसार तीन प्रकारच्या व्हिडिओ जाहिराती दाखविण्यात येणार नाहीत.

पुढील काळात जास्त लांबीच्या आणि ग्राहकाला हटविता किंवा बंद न करता येणाऱ्या व्हिडिओ स्वरुपातील जाहिराती बंद होतील. या जाहिराती युट्यूबवरील व्हिडिओ सुरू होण्याआधी दिसतात. पुढील काळात व्हिडिओच्यामध्येच दिसणाऱ्या दीर्घ मुदतीच्या जाहिराती दिसणार नाहीत. या स्वरुपाच्या जाहिरातींमुळे अनेक ग्राहकांना त्रास होतो. व्हिडिओ पाहण्याच्या त्यांच्या आनंदावर विरजण पडते. व्हिडिओ चौकटीच्या वर दिसणाऱ्या फोटो आणि टेक्स्ट स्वरुपातील जाहिरातीही बंद करण्यात येणार आहेत. या जाहिरातींमुळे व्हिडिओ चौकटीचा २० टक्के हिस्सा व्यापला जातो. त्यामुळे त्या बंद करण्यात येणार आहेत.

Leave a Comment