योगी सरकार धन्नीपूरमध्ये बाबरी मशीदसाठी देणार ५ एकर जमीन


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून राम मंदिर ट्रस्टची घोषणा होताच, उत्तर प्रदेशमधील योगी सरकारने देखील सुन्नी वक्फ बोर्डाला जमीन देण्याचा प्रस्ताव पास केला आहे. या संदर्भात वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार सुन्नी वक्फ बोर्डाला अयोध्येतील धन्नीपूर गावात जमीन देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत माहिती देताना सरकारचे प्रवक्ते सिद्धार्थनाथ सिंह यांनी म्हटले की, ५ एकर जमीन देण्याचा प्रस्ताव आज पास झाला असून यासाठी ३ पर्याय आम्ही पाठवले होते. ज्यामध्ये या जागेवर सहमती झाली आहे. धन्नीपूरमध्ये मशिदीसाठी जमीन दिली जाणार आहे. मुख्यालयापासून ही १८ किलोमीटरवर आहे.

बुधवारी झालेल्या बैठकीत केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ ट्रस्ट बवण्यासाठी मंजुरी दिली आहे. हा ट्रस्ट अयोध्येत राम मंदिराची निर्मिती आणि या संबंधित निर्णय घेण्यासाठी बनवण्यात येणार आहे. बुधवारी लोकसभेत याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. अयोध्या कायद्याच्या अंतर्गत सरकारने अधिग्रहण केलेली 67.70 एकर जागा ही राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्राला देणार असल्याचे देखील पंतप्रधानांनी म्हटले आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटले की, 15 ट्रस्टी श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र’ ट्रस्टमध्ये असतील. ज्यापैकी एक दलित समाजातून असतील. 5 एकर जमीन सुन्नी वक्फ बोर्डाला देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते. यूपी सरकारला याबाबत मोदी सरकारने आग्रह केला होता. त्यानंतर आता राज्य सरकारने देखील जमीन देण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Comment