बाळ जन्माला आल्यावर या देशात मिळणार दीड लाख रुपये बोनस

देशातील घटत्या लोकसंख्येच्या समस्येमुळे आता ग्रीस सरकारने ‘बेबी बोनस योजने’ची सुरुवात केली आहे. यंदाच्या वर्षी या योजनेचा सर्वात प्रथम लाभ मारिया परदलाकिस यांना मुलगा झाल्यानंतर मिळाला. मारियाचे पती क्रिस्टोस यांनी सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला मारियाने क्रेत येथील एका हॉस्पिटलमध्ये अर्ध्या रात्री बाळाला जन्म दिला. नवीन वर्षात मुलाच्या स्वरूपात आम्हाला एक मोठी भेट मिळाली. सोबतच बेबी बोनस मिळाल्यामुळे आनंदात अधिक वाढ झाली. हा बोनस आमच्या कुटुंबासाठी खूपच महत्त्वाचा आहे.

सरकारने बेबी बोनससाठी 1400 कोटी रुपये (1800 लाख यूरो) बजेट निश्चित केले आहे. योजनेंतर्गत जन्मदर वाढवण्यासाठी सरकार जोडप्यांना 2000 यूरो (जवळपास 1.58 लाख रुपये) बोनस देणार आहे. यूनायटेड नेशन्सच्या आकड्यांनुसार, सध्या ग्रीसची लोकसंख्या 1.07 कोटी आहे. सरकारी आकड्यानुसार, ग्रीसचा जन्मदर वाढला नाही तर पुढील 30 वर्षात ग्रीसची लोकसंख्या एक तृतीयांश कमी होईल. सध्या ग्रीसचा जन्मदर 1.33 टक्के प्रती महिला आहे. या आधारावर 2050 मध्ये ग्रीसची 36 टक्के लोकसंख्या 65 वर्षांपेक्षा मोठी असेल.

घटत्या लोकसंख्येची चिंता ग्रीकसोबतच स्पेन, इटली, फिनलँड आणि सायप्रस सारख्या देशांना देखील आहे. ग्रीसमध्ये 2010 ते 2015 साली 28 टक्के बेरोजगारी दरामुळे 5 लाख लोकांनी घर सोडले आहे. लाखोंच्या संख्येने ग्रीसचे नागरिक यूरोप, अमेरिका, कॅनडा आणि ऑस्ट्रेलियामध्ये स्थायिक झाले आहेत.

Leave a Comment