‘स्वराज्यरक्षक संभाजी’बाबत अमोल कोल्हेंचा मोठा खुलासा


झी मराठीवर प्रदर्शित होणारी, लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेली मालिका ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे वृत काही दिवसांपूर्वीच व्हायरल झाले होते. ज्यानंतर नेमकी कोणत्या टप्प्यावर ही मालिका अंतिम वळण घेणार आणि ती नेमकी का बंद केली जात आहे असेही प्रश्न उपस्थित करण्यात आले.

या मालिकेविषयी होणाऱ्या सर्व चर्चा पाहता त्यामध्ये अखेर खुद्द मुख्य भूमिका साकारणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांनीच काही महत्त्वाच्या गोष्टींचा खुलासा केला आहे. त्यांनी मालिकेविषयी होणाऱ्या कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचा सूर आळवला आहे.

अमोल कोल्हे यांनी सोशल मीडियावर एक ट्विट करत, स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेसंदर्भात गेले काही दिवस कोणतीही शहानिशा न करता कपोलकल्पित माहितीच्या आधारे सोशल मीडिया वर अफवा फिरवण्याचा प्रयत्न केला जात आहे. प्रेक्षक म्हणून आपल्याला मत व्यक्त करण्याचा अधिकार आहेच पण मालिका अजून पूर्णत्वाला गेलेली नसताना अपप्रचार करणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

ट्विटरवर करण्यात आलेल्या एका पोस्टनुसार, ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिकेसंदर्भात अर्धवट आणि चुकीच्या माहितीच्या आधारे अनेक पोस्ट फिरत आहेत. टीका करण्यासाठी सरसावलेल्या तथाकथित बोरुबहाद्दरांनी आणि मळमळ असह्य होऊन गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या सोशल मीडिया पंडितांनी मालिका संपूर्ण पहावी आणि मग प्रेक्षक या नात्याने टिप्पणी करावी. मालिका रोज रात्री ९ वाजता झी मराठी वाहिनीवर सुरु आहे याची नोंद घ्यावी, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.

Leave a Comment