‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ ट्रस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी


नवी दिल्ली : आज श्रीराम जन्मभूमीबाबत लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी घोषणा केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सकाळी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर लोकसभेत बोलत होते. राम मंदिर ट्रस्ट स्थापन करण्यास या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र’ या नावाची ट्रस्ट स्थापन करण्यात येणार आहे. 9 फेब्रुवारीपर्यंत ट्रस्ट स्थापन करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानुसार 67.7 एकर जमीन श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला हस्तांतरित करण्याची घोषणाही पंतप्रधान नरेंद्र मोदींनी यावेळी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी म्हटले की, राम मंदिराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एक योजना तयार करण्यात आली आहे. देशातील कोट्यावधी लोकांच्या जिव्हाळ्याचा राम मंदिर विषय आहे. मी राम जन्मभूमीच्या आणि राम मंदिर निर्मितीच्या विषयावर बोलत आहे, हे मी माझे भाग्य समजतो. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र समितीला 67.7 एकर जमीन हस्तांतरित करण्यात येणार आहे. तर सुन्नी वक्फ बोर्डालाही 5 एकर जमीन देण्यात येणार असून उत्तर प्रदेश सरकारने याला मंजुरी दिल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मोदी पुढे म्हणाले की, राम मंदिराच्या बाजूने सर्वोच्च न्यायालायने निर्णय दिला आहे. सुन्नी वक्फ बोर्डाला पाच एकर जमीन देण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. त्यानंतर मंत्रिमंडळाच्या बैठकीत आज तसे निर्णय घेण्यात आले आहेत. श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्ट राम मंदिर उभारणी संदर्भातील निर्णय घेईल. राम जन्मभूमीवर येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेत 67.7 एकर जमीन राम जन्मभूमी तीर्थक्षेत्राला हस्तांतरित केली जाणार आहे.

Leave a Comment