बांद्रा कलानगर भागात ३ अजगर दिसल्याने घबराट


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
मुंबईचे उपनगर बांद्रयाच्या कलानगर भागात शुक्रवारी रात्री अचानक तीन अजगर सापडल्याने घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते असे समजते. याच कलानगर भागात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान आहे. हे तिन्ही अजगर सर्पमित्र संघटनेने पकडले. त्यानंतर त्यांना बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात नेऊन या अजगरांची वैद्यकीय तपासणी केली गेली आणि त्यांना कोणतीही हानी झालेली नाही हे समजल्यावर जंगलात सोडण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री सर्पमित्र संघाकडे कलानगर भागात एक अजगर आल्याचा फोन आला. सर्पमित्र भागेश भागवत यांनी त्याच्या टीम सह घटनास्थळी जाऊन हा भलामोठा अजगर पकडला आणि बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स पोलीस ठाण्यात नेला तेव्हड्यात दुसरा अजगर दिसल्याचा फोन आला आणि पाठोपाठ तिसरा अजगर दिसल्याचा फोन आला. तेव्हा बाकीचे अजगरही या टीमने पकडले आणि अजगरांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची तपासणी करून त्यांना जंगलात सोडले गेले.

भागवत यांच्या मते या भागात एकापाठोपाठ तीन अजगर सापडणे नवलाचे आहे. मात्र त्यामागचे एक कारण असे असू शकते की या भागात बीकेसी मेट्रोची काम सुरु आहे. त्यामुळे जमिनीत मोठ्या प्रमाणावर कंपने निर्माण होतात व यामुळे हे अजगर त्यांचे ठिकाण सोडून बाहेर आले असावेत.

Leave a Comment