एअर इंडिया स्वगृही परतणार?


फोटो सौजन्य लाईव्हमिंट
सततच्या नुकसानी मुळे जेरीस आलेल्या एअर इंडियाला पुन्हा मुळ मालकाचा आधार मिळू शकेल अशी शक्यता निर्माण झाली आहे. टाटा ग्रुपने त्यांच्या विदेशी भागीदारांसोबत एअर इंडियासाठी बोली लावण्याची चर्चा सुरु केली आहे. असे घडले तर ८८ वर्षानंतर महाराजा पुन्हा स्वगृही परतू शकणार आहे.

उद्योजक जेआरडी टाटा यांनी १९३२ मध्ये टाटा एअरलाईन्स नावाने विमान सेवा सुरु केली होती. मात्र स्वातंत्र्यानंतर राष्ट्रीयीकरणाच्या रेट्यात १९४८ मध्ये ही कंपनी भारत सरकारच्या ताब्यात दिली गेली आणि तिचे एअर इंडिया असे नामकरण केले गेले. भारत सरकारच्या ताब्यात देताना या विमान कंपनीला इतकी दैनावस्था पहावी लागेल असे जेआरडीना कधी स्वप्नातही वाटले नसेल. मात्र चुकीची सरकारी धोरणे या कंपनीच्या मुळावर आली आणि सरकारसाठी आता हा पांढरा हत्ती पोसणे अवघड बनल्याने ही कंपनी विकून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला. केंद्र सरकारने एअर इंडियासाठी १७ मार्च पासून निविदा मागविल्या आहेत.


फोटो सौजन्य पत्रिका
एअर इंडियावर कोट्यवधी रुपयांच्या कर्जाचा बोजा आहे. टाटा सिंगापूर एअरलाईन्स सह बोली लावण्याच्या विचारात आहे. एअर एशिया आणि इंडियाचे विलीनीकरण करण्याची शक्यता पडताळून पाहिली जात आहे. एअर एशिया मध्ये टाटांची भागी ५१ टक्के आहे. या विलीनीकरणात एअर इंडियाची १०० टक्के सबसिडरी इंडिया एक्सप्रेस सामील व्हावी यासाठी इंडिया एक्सप्रेसचे टोनी फर्नांडीस यांच्याशी संपर्क साधला गेला असल्याचे समजते.

टोनी यांची एअर एशिया मध्ये ४९ टक्के भागी आहे. फर्नांडीस यांनी नकार दिला तर टाटा ग्रुप अन्य कोणत्याही बजेट एअरलाईन्स मध्ये १० टक्क्यांपेक्षा अधिक गुंतवणूक करू शकणार नाही असेही सांगितले जात आहे. टाटा विस्तारा नावाने एक एअरलाईन चालवीत असून त्यासाठी सिंगापूर एअरलाईन्स बरोबर भागीदारी करार केला गेला आहे. विस्तारा मध्ये टाटांची भागी ५१ टक्के आहे.

Leave a Comment