आज प्रथमच तिरंगी निशाणात होणार राफेलचे दर्शन


फोटो सौजन्य एनडीटीव्ही
आज म्हणजे ५ फेब्रुवारीला लखनौ येथे ११ व्या डिफेन्स शोचे उद्घाटन होत असून फ्रांसची दोसाँ एव्हीएशन कंपनी तिरंगी निशाणवाले राफेल प्रथमच जगासमोर सादर करणार आहे. ५ ते ९ फेब्रुवारी दरम्यान सुरु राहणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत आहे. या प्रदर्शनात ७० देशांतील १७२ कंपन्या त्यांची संरक्षण उपकरणे सादर करणार असून भारतातील ८५७ कंपन्या त्यात सहभागी झाल्या आहेत. आशियातील सर्वात मोठ्या अश्या या प्रदर्शनाला ४० देशांचे संरक्षण मंत्री उपस्थित राहणार आहेत.

राफेल बरोबरच अमेरिकेची लॉकहिड मार्टीन कंपनी त्यांची एफ ३५ लायटनिंग सेकंड लढाऊ विमाने जगासमोर प्रथमच सादर करणार आहे. ही विमाने भारत सरकारने खरेदी करावीत असा त्यांचा प्रयत्न आहे.

यापूर्वीचे डिफेन्स एक्स्पो नवी दिल्ली येथेच होत असत. पण मोदी सरकारच्या काळात सर्व संरक्षणमंत्र्यांच्या गृहराज्यात हे प्रदर्शन भरविण्याची प्रथा सुरु झाली आहे. २०१६ मध्ये हे प्रदर्शन गोवा येथे झाले तेव्हा मनोहर पर्रीकर गृहमंत्री होते आणि गोव्याचे ते मुख्यमंत्रीही होते. २०१८ मध्ये हे प्रदर्शन तत्कालीन संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या तमिळनाडू राज्यात भरविले गेले तर यंदाचे प्रदर्शन गृहमंत्री राजनाथसिंग यांच्या लखनौ मतदारसंघात होत आहे.

या प्रदर्शनात वृंदावन मैदानावर शस्त्रे मेळा भरविला गेला आहे. त्यात पिनाक रॉकेट लाँचर पासून धनुष तोफ, आयसेफ लेझर, नाईट व्हिजन डिव्हायसेस, ऑप्टिकल टार्गेट लोकेटर, एक्स्प्लोझीव डिटेक्टर अश्या अनेक उपकरणांचा समावेश आहे. सुखोई ३० एमकेआय, जग्वार, चिनूक, चिता लखनौ विमानतळावरून उड्डाणे करतील तर गोमती रिव्हर फ्रंट मध्ये भारतीय नौदल त्याची ताकद दाखविणार आहे.

Leave a Comment