या पठ्ठ्याने चक्क 99 स्मार्टफोन्सद्वारे गुगल मॅप्सला केले हॅक

गुगल मॅप्सचा वापर आपण एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी, तसेच कोणत्या रस्त्यावर किती वाहतूक आहे हे पाहण्यासाठी करतो. याच्यावर विश्वास ठेऊनच आपण आपला रस्ता देखील निवडतो. मात्र या रस्त्यावर खरचं वाहतूक असते का ? हे तंत्र देखील 100 टक्के अचूक नसल्याचे एका जर्मनीच्या व्यक्तीने दाखवून दिले आहे.

जर्मनीच्या सिमोन वेकर्टने बर्लिनच्या रस्त्यावर व्हर्च्युअल वाहतूक बनवून गुगल मॅप्सलाच वेड्यात काढले आहे. सिमोनने युट्यूबवर एक व्हिडीओ देखील अपलोड केला असून, यात त्याने असे कसे केले हे सांगितले आहे.

सिमोनने यासाठी 99 स्मार्टफोन्सची मदत घेतली. म्हणजेच बर्लिनच्या ज्या रस्त्यावर वाहतूक नसताना देखील, या फोन्सच्या सहाय्याने त्याने वाहतूक दाखवली. यासाठी त्याने कोणतेही सॉफ्टवेअर वापरले नाही, तसेच गुगल अकाउंट देखील हॅक केले नाही.

व्हिडीओमध्ये दाखवले आहे की, सर्व फोन्सला एका कार्टमध्ये ठेवण्यात आलेले आहे व सिमोन ज्या रस्त्यावर वाहतूक नाही, तेथून जात आहे. यावेळी त्याने सर्व फोन्समध्ये गुगल मॅप्सला सुरू ठेवले आणि तो वेगवेगळ्या रस्त्यावरुन चालू लागला. जसजसे सिमोन रिकाम्या रस्त्यावरुन जात होता, तसतसे गुगल मॅपवर वाहतुकीची स्थिती बदलत होती. मॅपवरील वाहतूक ग्रीनवरुन रेड होत गेली.

गुगल मॅपला कसे भरकटवले ?

गुगल मॅप हे कोणत्याही जागेवरील वाहतुकीची स्थिती दर्शवण्यासाठी त्या भागातील स्मार्टफोनच्या लोकेशनचा वापर करते. सोबतच अन्य फोनचा डेटा देखील वापरला जातो. त्यानंतर वेग, लोकेशन आणि अन्य क्राउडसोर्स डेटाचे विश्लेषण करुन गुगल त्या भागातील लाईव्ह वाहतूक दर्शवते. सिमोनने या सर्व स्मार्टफोन्सचा वापर केला, गुगलला हे सर्व फोन्स एकाच जागेवर आढळले व मॅपवर वाहतूक असल्याचे दर्शवले.

https://twitter.com/torreyh/status/1224032739713634305

गुगलने यावर अधिकृत प्रतिक्रिया दिली नसली तरी गुगल मॅप्सचे वरिष्ठ सॉफ्टवेअर इंजिनिअर टॉरी हॉफमॅन यांनी ट्विट केले की, अशाप्रकारे स्टंट करुन हे करणे शक्य आहे.

Leave a Comment