पुढच्या महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी : उद्धव ठाकरे


मुंबई: मी शेतकऱ्यांना त्यांचा सातबारा कोरा करण्याचा शब्द दिला असून दिलेल्या शब्दाप्रमाणे ही योजना येत्या मार्च महिन्यापासून सुरू करण्यात येईल, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. ज्यांच्यावर दोन लाखांपर्यंत पीक कर्ज आहे, ते पूणपणे माफ होणार असून ही पीककर्ज त्याच्या सातबारावरून काढून टाकले जाणार असल्याचेही मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. दोन लाखांपेक्षा वर असलेल्या कर्जदारांसाठी आणि विशेषत: जे नियमित कर्ज फेडत आहेत अशांसाठी लवकरच योजना जाहीर करून लवकरच ती अंमलात आणली जाईल अशी घोषणाही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्राचे कार्यकारी संपादक, खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या दीर्घ मुलाखतीच्या दुसऱ्या भागात बोलत होते. मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, या योजना कार्यान्वित करत असताना राज्याच्या आर्थिक परिस्थितीचा आढावा घेऊनच या योजना तयार करण्यात येणार आहेत. मी आताही मला करायची असेल तर घोषणा करू शकतो. असे नाही की योजना तयार नाही. एखादी योजना तयार केल्यानंतर ती अमलात आणण्याची तयारी झाल्यानंतर ती अमलात आणावी लागते.

यावेळी मुख्यमंत्री कर्जमाफी हा प्रथमोपचार असल्याचे म्हणाले. आपल्या पायावर शेतकरी कसा उभा राहील यासाठी आपला प्रयत्न असला पाहिजे. त्याकरिता शेतीसाठी नवे प्रयोग कसे करता येतील, जास्त पीक कमी जागेत कसे घेता येईल, ते पीक आल्यानंतर त्याला योग्य दाम किंवा योग्य भाव कसा मिळवून दिला जाईल, त्याचे मार्केटिंग कसे केले जाईल, अशी संपूर्ण माहिती असायला हवी. याची आखणी करण्याची आवश्यकता असून त्याबद्दल सुद्धा निर्णय घेतले असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Leave a Comment