भारतीय दिवसाचे साडेसहा तास घालवतात इंटरनेटवर

सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी व्ही आर सोशल आणि हूटसुटने जगभरातील इंटरनेट युजर्स आणि मोबाईल युजर्सबद्दल आकडेवारी जारी केली आहे. या अहवालामध्ये, डिजिटल जगात मोबाईल आणि सोशल मीडियावर लोक किती वेळ घालवतात याविषयी सांगण्यात आले आहे. ही आकडेवारी जानेवारी 2020 पर्यंतची आहे. जगातील 92 टक्के लोक मोबाईलद्वारे इंटरनेटचा वापर करत असल्याचे अहवालातून समोर आले आहे.

अहवालात सांगण्यात आले आहे की, जगभरात 4.5 अब्ज लोक इंटरनेटचा वापर करत आहेत. तर सोशल मीडिया युजर्सची संख्या 3.8 अब्जाच्या पुढे गेली आहे. म्हणजेच जगातील 60 टक्के लोकसंख्या ऑनलाईन झाली आहे. जगभरात मोबाईल युजर्सची संख्या 5.19 अब्ज झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत ही संख्या 12.4 कोटींनी अधिक आहे.

या अहवालानुसार, एका वर्षात आपण सरासरी 100 दिवस इंटरनेटवर घालवतो. संपुर्ण जगात दिवसाला इंटरनेटवर सरासरी 6 तास 43 मिनिटे घालवली जातात. जे मागील वर्षीच्या तुलनेत 3 मिनिटे कमी आहेत. जर आपण प्रतिदिन झोपण्याचे 8 तास सोडले तर दररोजचा 40 टक्के वेळ इंटरनेटवर घालवला जात आहे. एका अंदाजानुसार, केवळ 2020 मध्ये जगभरातील लोक मिळून 1.25 अब्ज वर्ष वेळ इंटरनेटवर घालवतील.

सर्वाधिक इंटरनेट वापरणाऱ्या देशांमध्ये फिलीपाइन्स आघाडीवर आहे. फिलीपाइन्सचे लोक 24 तासामधील 9 तास 45 मिनिटे स्मार्टफोनवर घालवतात. दुसऱ्या क्रमांकावर दक्षिण आफ्रिका असून येतील लोक 9 तास 22 मिनिटे मोबाईलवर घालवतात. भारताचे लोक दिवसाला इंटरनेटवर सरासरी 6 तास 43 मिनिटे घालवतात. तर चीनच्या नागरिकांचे दिवसाला 5 तास 50 मिनिटे इंटरनेटवर जातात. जापानचे लोक सर्वाधिक कमी 4 तास 22 मिनिटे दिवसाला इंटरनेटचा वापर करतात.

अहवालात सांगण्यात आले आहे की, 89 टक्के लोक चॅटिंग आणि सोशल मीडिया अ‍ॅपचा वापर करतात. त्यानंतर 65 टक्के लोक व्हिडीओ अ‍ॅप, 47 टक्के गेमिंग, 66 टक्के शॉपिंग, 52 टक्के म्यूझिक आणि 35 टक्के लोक बँकिंग अ‍ॅप्सचा वापर करतात.

Leave a Comment