रोझव्हॅली चिटफंड घोटाळा, शाहरुखच्या कंपनीची बँक खाती गोठवली


फोटो सौजन्य रिपब्लिक
बहुचर्चित रोझव्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान याच्या कोलकाता नाईट रायडर्स स्पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची बँक खाती गोठविली आहेत. आयपीएल फ्रँचायजी टीम कोलकाता नाईट रायडर्सचे मालकी हक्क रेड चिलीज एंटरटेनमेंटशी संबंध असल्याचे सांगितले जात असून शाहरुख खान या कंपनीचा संस्थापक आहे. त्याचबरोबर शाहरुखची पत्नी गौरी आणि बॉलीवूड अभिनेत्री जुही चावला आणि तिचे पती जय मेहता त्यात भागीदार आहेत.

कोलकाता नाईट रायडर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वेंकी मैसूर यांची गेल्या ऑक्टोबर मध्ये इडीने चौकशी केली होती. रोझव्हॅली चिटफंट बँक खात्यातून कोलकाता नाईट रायडर्स प्रा. लिमी. ला पैसे दिले गेले होते असे तपासात आढळून आले आहे. इडीने या प्रकरणी ७० कोटींची संपत्ती जप्त केली असून त्यात सेंट झेव्हिअर कॉलेज, मल्टीपल रिसोर्टस यांच्या बँक खात्यांचाही समावेश आहे.

तृणमुल कॉंग्रेसच्या अनेक बड्या नेत्यांची रोझव्हॅली चिटफंड घोटाळा प्रकरणी चौकशी केली गेली आहे. सुदीप बंदोपाद्याय आणि तापस पाल याना या प्रकरणी इडीने अटक केली होती. अभिनेत्री ऋतुपर्णा सेनगुप्ता हिचीही चौकशी झाली आहे. तिच्या चित्रपटासाठी रोझव्हॅली चिटफंडने फंडिंग केले होते. रोझव्हॅली चिटफंडने २०१३ मध्ये २७ कंपन्या स्थापून बंगाल, आसाम, बिहार मधून १७२५० कोटी रुपये गुंतवणूकदारांकडून जमा केले होते. त्यातील १०८५० कोटी रु. गुंतवणूकदारांना परत दिले गेले आहेत मात्र ६६७० कोटी रुपये परत केले गेलेले नाहीत.

Leave a Comment