महापौरपदाच्या शर्यतीत दोन कुत्री आणि एक बकरी


फोटो सौजन्य एशीया नेट
अमेरिकेच्या उत्तरपूर्व व्हरमोंटच्या फेअर हेवन भागात महापौर पदासाठी मतदान होत असून या निवडणुकीत दोन कुत्री आणि एक बकरी यांच्यात सामना आहे. मार्च मध्ये झालेल्या निवडणुकीनंतर महापौर म्हणून निवडली गेलेली तीन वर्षाची बकरी न्युबीयन लिंकन पुन्हा यंदा निवडणूक लढवीत असून यावेळी तिला सहा वर्षाचा सॅमी आणि मफी या दोन कुत्र्यांचा सामना करावा लागणार आहे. खरी स्पर्धा लिंकन आणि सॅमी यांच्यात असली तरी मफी मतदारांचे लक्ष वेधून घेण्यात अधिक पुढे असल्याचे दिसून आले आहे.

या निवडणुकीसाठी ३ मार्च ला मतदान होणार आहे. मत देण्याबद्दल मतदारांना पैसे वगैरे काही मिळणार नाहीत तर उलट मतदारांनीच १ डॉलर द्यायचा आहे आणि मतदानासाठी नोंदणी करताना ५ डॉलर्स द्यायचे आहेत. या निवडणुकीचा उद्देशच या मतदानातून जो फंड गोळा होईल त्यातून मुलांसाठी कम्युनिटी प्ले ग्राउंड तयार करणे हा आहे. त्यातून पैसे उरले तर अनाथ मुलांच्या पुनर्वसनासाठी वापरले जाणार आहेत.

या शहराचे मॅनेजर जो गुंटर म्हणाले, या निवडणुकीत उतरलेल्या सॅमी या जर्मन शेफर्ड कुत्र्याचे नामांकन पोलीस चीफ बिल हॅम्फ्रीज यांनी केले आहे. दुसरा उमेदवार, मफीची मालकीण लिंडा सांगते, मफी हा सर्टिफाईड थेरपी कुत्रा असून तो रुग्णालयात जाऊन आजारी माणसांची मदत करतो. त्याच्यामुळे निवडणुकीत रंगत आली आहे. तर लिंकनने गतवर्षी महापौर पदाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडली असून ती पुन्हा विजयी झाली तर बकरी योग मध्ये करिअर करणार आहे. अमेरिकेत सध्या हा योग खुपच लोकप्रिय असून यात स्थिर शरीर ठेऊन पाठीवर बकरीचा बॅलंस केला जातो.

येथे निवडणूक फंडातून उभारण्यात येणाऱ्या मैदानासाठी ८० हजार डॉलर्सची आवश्यकता असून आत्तापर्यंत १० हजार डॉलर्स जमले आहेत. महापौर होणाऱ्यावर परेड मार्च करून पैसे मिळविण्याची जबाबदारी असते.

Leave a Comment