ज्यांचा बाप काढत आहात त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्य होईल


मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी टीका केल्यानंतर भाजपला महाविकासआघाडीच्या नेत्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. भाजप ज्यांचा बाप काढत आहे, त्यांनी मनात आणले तर मुंबईत फिरणे अशक्य होईल, असा थेट इशारा जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिला आहे. नागरिकत्व सुधारणा कायदा लागू न करायला हे बापाचे राज्य आहे का, असे विधान आशिष शेलार यांनी केले होते. त्यामुळे हा वाद वाढण्याची शक्यता आहे.

जयंत पाटील म्हणाले, एवढे भाजपने घसरण्याची गरज नाही. मला वाटते त्यांना आशा होती, ती पूर्ण झाली नाही. म्हणूनच ते चिडले आहेत आणि बाप काढण्याच्या पातळीवर गेले. पण आपण कुणाचा बाप काढतो आहोत याचेही भान यांना राहिलेले नाही. ज्यांचा बाप ते काढतात त्यांनी जर मनात आणले तर मुंबईत यांना फिरणे देखील अशक्य होईल. पण, टीका करताना पातळी घसरण्याची भाजपवर का वेळ आली याचे भाजपने आत्मचिंतन करावे.