बदलली अजय देवगणच्या ‘मैदान’ची रिलीज डेट


लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला फुटबॉल खेळाचा रंजक सुवर्णकाळ उलगडणारा ‘मैदान’ चित्रपट येणार आहे. यामध्ये अभिनेता अजय देवगन मुख्य भूमिका साकारत असून या चित्रपटाचा फर्स्ट लुक काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता या चित्रपटाची रिलीज डेट बदलण्यात आली असून नुकतेच या चित्रपटाचे नवे पोस्टर रिलीज करत नव्या तारखेबाबत माहिती देण्यात आली आहे.

या चित्रपटाचे नवे पोस्टर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहे. आता ११ डिसेंबर २०२० ला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू भाषांमध्येही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अजय देवगन या चित्रपटात फुटबॉल प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे.


अजय देवगन ‘मैदान’ चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच ‘बधाई हो’ चित्रपटाचे दिग्दर्शक अमित रविंद्रनाथ शर्मा यांच्यासोबत काम करत आहे. त्याच्यासोबत या चित्रपटात दाक्षिणात्य अभिनेत्री प्रियामनी ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तर, गजराज राव यांचीही यामध्ये भूमिका पाहायला मिळणार आहे.

भारतीय फुटबॉलचा १९५२ ते १९६२ हा सुवर्ण काळ मानला जातो. याच काळातील फुटबॉल स्पर्धेचा थरार या चित्रपटातून पडद्यावर पाहायला मिळेल. या चित्रपटाची पटकथा आणि संवाद सैविन कुद्रास आणि रितेश शाह यांचे आहे. झी स्टुडिओ आणि बोनी कपूर, अकाश चावला आणि अर्णव जॉय सेनगुप्ता यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.

Leave a Comment