या देशांत लठ्ठपणा, पत्ते, सावलीवरही लागतो कर


फोटो सौजन्य निहानस्कोप
कोणत्याही देशाची अर्थव्यवस्था सुस्थितीत असण्यासाठी नागरिकांकडून वसूल केले जाणारे कर महत्वाची भूमिका बजावत असतात. भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी १ फेब्रुवारी रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात नवीन कोणते कर लागू झाले आणि त्याचे फायदे तोटे हे काही दिवस चर्चेचे विषय असतील. पण काही देशात आपण कल्पनाही करू शकत नाही असे कर नागरिकांना भरावे लागतात.

याचे नमुनेदार उदाहरण आहे जपान देश. येथे लठ्ठपणावर कर आकारला जातो. त्यासाठी मोताबो कायदा केला गेला आहे. त्यानुसार ४० ते ७५ या वयोगटातील नागरिकांच्या कमर घेराची तपासणी दरवर्षी केली जाते. त्यात पुरुषांचा कमर घेर ८५ सेमीपेक्षा अधिक व महिलांचा कमर घेर ९० सेंटीमीटरपेक्षा अधिक असेल तर त्यांना जादा कर भरावा लागतो. इटली मधील वेनेटो शहरात कॉनेग्लीयानो या ठिकाणी हॉटेल, रेस्टॉरंट, दुकानाच्या बोर्डची सावली गल्लीत पडली तर १०० डॉलर्स कर द्यावा लागतो.


अमेरिकेच्या अलाबामा येथे खेळण्याचे पत्ते खरेदी केले की १० टक्के कर द्यावा लागतो शिवाय सेलरला १ डॉलर आणि वार्षिक परवान्यासाठी ३ डॉलर्स कर म्हणून भरावे लागतात. अर्थात हा कर कॅटमध्ये ५४ किंवा त्यापेक्षा कमी पाने असतील तरच द्यावा लागतो. अमेरिकेत ओर्कांस राज्यात शरीरावर टॅटू काढले तर ६ टक्के कर भरावा लागतो. तर ऑस्ट्रियात प्लास्टर टॅक्स वसूल केला जातो. येथे आल्प्स मध्ये स्कीइंगसाठी खूप पर्यटक येतात त्यातील बरेचसे अनुभवी नसतात आणि स्कीइंग करताना पडल्यामुळे अनेकांना प्लॅस्टर करावे लागते. अर्थात हा कर पर्यटन कराबरोबर संबंधित हॉस्पिटल कडून वसूल केला जातो.


फोटो सौजन्य वनडीओ
स्पेनच्या बेलरिक द्वीपसमूहात दरवर्षी सरासरी १ कोटी १० लाख पर्यटक येतात. त्यामुळे लोकल रिसोर्सवर ताण येतो. यावर उपाय म्हणून येथे सन टॅक्स म्हणजे ऊन कर आकाराला जातो. हा कर २ ते ४ डॉलर्स इतका आहे. चीन मध्ये लाकडी चॉपस्टिक वर ५ टक्के कर आकाराला जातो. या देशात चॉपस्टिक हे जेवणाचे साधन असून दरवर्षी अंदाजे ४५ अब्ज डिस्पोजेबल चॉपस्टिक वापरल्या जातात आणि त्यासाठी अडीच कोटी झाडे तोडावी लागतात. त्यामुळे २००६ पासून हा कर लागू झाला आहे.

Leave a Comment