सोनिया गांधी रुग्णालयात दाखल


फोटो सौजन्य द हिंदू
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांना रविवारी सायंकाळी सर गंगाराम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सोनिया यांना पोट दुखण्याचा त्रास होऊ लागल्यावर त्यांना रुग्णालयात नेण्यात आले असून तेथे त्यांच्या तपासण्या आणि उपचार सुरु आहेत. त्यांच्यासोबत राहुल आणि प्रियांका गांधी आहेत. कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनीही सोनिया यांची रुग्णालयात भेट घेतली.

दिल्ली विधानसभा निवडणुका अगदी तोंडावर असताना सोनिया यांचे आजारपण कॉंग्रेससाठी चांगला संकेत नसल्याचे मानले जात आहे. ७३ वर्षीय सोनिया यांची तब्येत गेली काही वर्षे ठीक नाही. शनिवारी अर्थसंकल्प सादर होत असताना त्या लोकसभा सभागृहात हजर नव्हत्या तसेच निवडणूक प्रचारापासून त्या दूर राहत आहेत. लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जबरदस्त पराभव स्वीकारावा लागल्यावर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर सोनिया यांची या पदावर हंगामी अध्यक्ष म्हणून निवड केली गेली होती.

कॉंग्रेस अध्यक्षपद सर्वाधिक काळ भूषविण्याचा विक्रम सोनिया गांधी यांच्या नावावर आहे.

Leave a Comment