भेटवस्तू देताना ..


बरेचदा आपल्याला कोणत्या ना कोणत्या निमित्ताने कोणाच्या तरी घरी भोजनसमारंभास आमंत्रण येते, किंवा ऑफिस मध्ये एखादा प्रसंग साजरा करण्याच वेळ ही अनेकदा येते. अश्या वेळी भेटवस्तू देताना काही गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. आपण कोणाच्या घरी भोजन समारंभास आमंत्रित असताना, यजमानांनी बरोबर कोणतीही भेटवस्तू आणू नका असे सांगितले असले, तरी आपण रिकाम्या हातांनीच जावे का, असा प्रश्न आपल्याला नेहमीच पडत असतो. अश्या वेळी कोणाच्याही घरी जाताना लहानशी का होईना, पण एखादी भेटवस्तू नेणे योग्य ठरते. जर भेटवस्तू द्यायची नसेल, तर तुम्ही घरी बनविलेला एखादा खास पदार्थ देखील भेटीदाखल देऊ शकता. यजमान या भेटीचा स्वीकार नक्कीच करतील.

कोणत्याही कारणास्तव ऑफिसमध्ये भेट देण्याचा प्रसंग आलाच, तर शक्यतो अशी भेटवस्तू असावी, जी सर्वांनाच देता येईल. चॉकलेट्स किंवा तुम्ही स्वतः बनविलेला खास केक, किंवा इतर खाद्यपदार्थ अश्या वेळी योग्य भेटवस्तू ठरतात. जर काही ठराविक व्यक्तींनाच भेटवस्तू द्यावयाच्या असतील, तर त्याची जाहिरात न करता, या भेट वस्तू द्याव्यात, अन्यथा इतरांची मने दुखविली जाण्याची संभावना असते. जर तुम्हाला एखादी भेटवस्तू मिळाली, तर धन्यवाद देणारा संदेश पाठवायला विसरू नका.

आपल्याला जर कोणी भेटवस्तू पाठविली असेल, तर धन्यवादपर संदेश जरूर पाठवायला हवा. भेटवस्तू मिळाल्याच्या साधारण दोन ते तीन दिवसांच्या अवधीमध्ये धन्यावादपर संदेश पाठविणे योग्य असते. हा संदेश तुम्ही फोन द्वारे किंवा ई मेल द्वारेही पाठवू शकता. जर कोणी तुमच्याकरिता खास काही भेटवस्तू पाठविली असेल, तर त्याकरिता हस्तलिखित संदेश पाठविणे चांगले. एखाद्या व्यक्तीने जर तुम्हाला भेटवस्तू दिली, तर त्या बदलयात तुम्हीही काही तरी भेटवस्तू देणे अपेक्षित असते. पण कित्येकदा असे घडते की अचानक आलेले पाहुणे काही ना काही भेटवस्तू घेऊनच येतात, आणि आपल्याकडे मात्र त्यांना देण्यासारखी कोणतीच भेटवस्तू ऐनवेळी हाताशी नसते. अशा वेळी पाहुण्यांनी आणलेल्या भेटवस्तूबद्दल त्यांचे आभार मानावेत आणि धन्यावाद देणारा संदेश पाठविताना त्याबरोबर एखादी लहानशी भेटवस्तूही पाठवावी.

भेटवस्तू देताना महागड्या वस्तू देण्यापेक्षा, ज्याला भेट द्यायची त्याची गरज, किंवा त्याची रुची लक्षात घेऊनच भेटवस्तू निवडावी. आपण किती किमतीची भेटवस्तू दिली या पेक्षा सुद्धा, ज्याला भेट दिली, त्याला त्या भेटवस्तूचा उपयोग होणार आहे किंवा नाही याचा विचार करावा. सुटीच्या काळामध्ये आपल्या घरी अनेकदा पाहुणे मुक्कामाला येतात. सुटी संपवून पाहुणे निघत असताना त्यांना भेटवस्तू देणे अगत्याचे असते. कारण बहुतेकवेळी पाहुणे मुक्कामाला येतात, तेव्हा ते देखील काही ना काही भेटवस्तू घेऊनच आलेले असतात. त्यामुळे आपणही आपल्याकडून पाहुण्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन भेटवस्तू द्याव्यात.

आजकाल कोणत्याही प्रसंगासाठी कोणतीही वस्तू भेटीदाखल देण्यापेक्षा ‘ गिफ्ट व्हाउचर्स ‘ भेटीदाखल देणे, ही देखील चांगली कल्पना आहे. आजकाल सर्व प्रकारच्या वस्तूंच्या ब्रँड्सची गिफ्ट व्हाऊचर्स अगदी सहज उपलब्ध असतात. आगाऊ पैसे भरून ही गिफ्ट व्हाऊचर्स आपल्याला विकत घेता येतात. ज्याला आपण ही व्हाऊचर्स भेट म्हणून देतो, ती व्यक्ती त्या दुकानामधून त्या व्हाऊचर वरील किमतीप्रमाणे मनाजोगती खरेदी करु शकते.

भेटवस्तू देताना त्याचे पॅकेजिंग साधेच असले, तरी आकर्षक असावे. तसेच गिफ्ट रॅपिंग पेपरमध्ये भेटवस्तू लपेटून ती एखाद्या गिफ्ट बॅग मध्ये घालून मगच द्यावी. त्यासोबत एखादे शुभेच्छा देणारे कार्ड आणि भेट देत असलेल्या व्यक्तीचे नाव लिहिलेले असावे. जर आपण देत असलेल्या वस्तुसोबत वॉरंटी कार्ड असेल, तर ते ही भेटवस्तुसोबत देण्यास विसरू नये. आपल्याला भेटीदाखल मिळालेली वस्तू आपल्याकडे आधीपासूनच असेल, तर ती वस्तू आपल्याला ठेवायची आहे की नाही याचा विचार करावा. जर एखाद्याला त्या वस्तूची गरज असेल, तर त्याला ती वस्तू देऊन टाकावी, व देताना ओरिजिनल पॅकिंग सहित द्यावी.

Leave a Comment