घसा खराब आहे? त्यासाठी करा हे उपाय


उन्हाळयामध्ये जास्त थंड पाणी प्यायल्याने, आईसक्रीम किंवा इतर थंड पदार्थ खाल्ल्या-प्यायल्याने घसा खराब होण्याची, दुखू लागण्याची शक्यता असते. तसेच थंडीमध्ये ही गार हवामानामुळे घसा खराब होतो. आजकाल हवामानही इतक्या अचानकपणे बदलत असते, त्यामुळे ही सर्दी किंवा खोकला होऊन घशाला आतून सूज येते, व घसा दुखू लागतो. या घसेदुखीपासून आराम मिळविण्याकरिता काही उपाय घरच्याघरी करता येतील, मात्र हे उपाय अगदी प्राथमिक स्वरूपाचे आहेत.

सर्दी किंवा खोकला सुरु होण्याआधी घसा खवखवतो, किंवा आतून खाजल्यासारखी भावना होते, अश्यावेळी गरम पाण्यामध्ये थोडेसे मीठ घालून गुळण्या कराव्यात. मिठामध्ये अँटी बॅक्टेरियल प्रॉपर्टीज असल्याने घसा खवखवणे थांबते. या साठी एक ग्लास गरम पाण्यामध्ये पाव लहान चमचा मीठ घालून त्याने गुळण्या कराव्यात. असे दिवसातून तीन ते चार वेळा करावे.

गरम दुधामध्ये हळद घालून ह्या दुधाचे सेवन केल्याने ही घशाला आराम मिळतो. ही पद्धत आपल्याकडे फार पूर्वीपासून चालत आलेली आहे. हळद अँटी बायोटिक असल्याने घशातील इन्फेक्शन कमी होऊन सूजही कमी होण्यास हळद मदत करते. त्यामुळे गरम दुधामध्ये हळद घालून ह्याचे सेवन केल्यास फायदा होतो.

आले, थोडीशी साखर, दालचीनी, आणि ज्येष्ठमध थोड्या पाण्यामध्ये उकळून घेऊन हा काढा घेतल्याने ही घसा बरा होण्यास मदत होते. ह्या सर्व वस्तू पाण्यामध्ये दहा मिनिटे उकळून घेऊन काढा तयार करावा, व दिवसातून तीन ते चार वेळेला या काढ्याचे सेवन करावे. त्याचप्रमाणे एक ग्लास गरम पाण्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस आणि एक चमचा मध घालून ते पाणी प्यायल्यानेही घशाला आराम मिळतो. विशेषतः जर कोरडा खोकला येऊन घसा दुखत असेल, तर गरम पाणी आणि मधाचा लाभ अधिक होतो.

एक ग्लास पाण्यामध्ये एक मोठा चमचा अॅपल सायडर व्हिनेगर घालून प्यायल्याने ही घसादुखी कमी होते. या उपायाने कफ ही कमी होतो. तसेच अॅपल सायडर व्हिनेगर पिण्यास आवडत नसले तर ते गरम पाण्यामध्ये घालून त्याने गुळण्या केल्यावरही आराम पडतो. सतत खोकल्याची ढास लागून घसा दुखत असेल, तर तोंडामध्ये लसणीची एक पाकळी ठेऊन ती टॉफी प्रमाणे चघळावी. त्याने ही घसादुखी कमी होऊन खोकल्याची ढास लागणे कमी होते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment