मायग्रेन; कारणे, लक्षणे आणि उपाय


मेंदूच्या कार्यामध्ये काही कारणांनी झालेल्या बदलामुळे उद्भविणाऱ्या डोकेदुखीला वैद्यकीय भाषेमध्ये मायग्रेन असे म्हटले गेले आहे. ही डोकेदुखी अतिशय तीव्र स्वरुपाची असून, कोणत्याही प्रकारच्या आवाजाने, प्रखर उजेडाने किंवा ठराविक वासाने ही आणखीनच बळावते. मायग्रेनच्या विकारामध्ये डोकेदुखी सोबत क्वचितप्रसंगी डोळ्यासमोर प्रकाशाचे ठिपके येणे, डोळ्यासमोर अंधारी येणे, किंवा उलट्या होणे अशी लक्षणेही दिसू शकतात. मेंदूमधील रक्तप्रवाहामध्ये बदल झाल्यास किंवा अचानकपणे मेंदूमधील नर्व्ह सिग्नल्स मध्ये काही बदल झाल्यास ही डोकेदुखी उद्भवू शकते.

मायग्रेनची डोकेदुखी उद्भविण्यामागे आणखीही काही कारणे आहेत. कोणत्याही प्रकारच्या अॅलर्जी, शारीरिक थकवा, अपुरी झोप, कोणत्याही प्रकारचा मानसिक तणाव, काही ठराविक औषधांचे सेवन, किंवा अति प्रमाणात मद्यपान ह्या कारणांमुळेही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो. मायग्रेनमुळे होत असणाऱ्या डोकेदुखीमध्ये डोक्यामध्ये ठोके पडल्याप्रमाणे डोके दुखत राहते. तसेच कोणत्याही प्रकारच्या हालचालीमुळे ही डोकेदुखी अजूनच वाढते. डोके एका बाजूलाच दुखत राहते. आपण असलेल्या ठिकाणी कमीजास्त होत असलेला प्रकाश, किंवा बदलणारे तापमान यामुळेही डोकेदुखी बळावू शकते.

मायग्रेनचा त्रास लहानपणापासून किंवा अगदी तरुण वयामध्ये सुरु होतो. काही प्रमाणात हा विकार अनुवांशिकही आहे. तसेच हार्मोन्स मध्ये निर्माण होणाऱ्या बदलांमुळे किंवा असंतुलनामुळेदेखील मायग्रेन चा त्रास होऊ शकतो. पुरुषांच्या मानाने स्त्रियांमध्ये मायग्रेनच्या त्रासाचे प्रमाण जास्त आढळते. जेवणाच्या वेळा अनियमित असणे, किंवा जेवणाला एखाद्या वेळी अजिबात फाटा देणे, वारंवार उपवास करणे, मोनोसोडियम ग्लूटामेट वापरून बनविलेल्या खाद्य पदार्थांचे जास्त प्रमाणात सेवन करणे, किंवा सोडा युक्त खाद्यपदार्थ जास्त खाणे या मुळे ही मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

अल्झायमर, एपिलेप्सी किंवा तत्सम नर्व्हस डिसॉर्डर असलेल्या रुग्णांमध्येही मायग्रेन हा विकार पहावयास मिळतो. तसेच आपण घेत असलेल्या काही औषधांमधील रसायने आपल्या शरीराला मानविणारी नसली तरी मायग्रेन होऊ शकते. उदाहरणार्थ, गर्भप्रतिबंधक औषधांमुळे मायग्रेन उद्भविल्याचे पाहिले गेले आहे. मायग्रेनमुळे डोकेदुखीसोबतच मळमळल्यासारखी भावना होऊ शकते. तसेच डोक्याबरोबर मान दुखणे किंवा मान अवघडणे अश्या तक्रारीही उद्भवू शकतात. अश्या वेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तसेच मायग्रेन मुळे जेवण झाल्यानंतर ही परत परत भूक लागू शकते. क्वचित प्रसंगी डोकेदुखी इतकी वाढते की ती व्यक्ती संपूर्णपणे गोंधळून जाते, आणि आपण कुठे आहोत याचे भानही त्या व्यक्तीला राहत नाही.

मायग्रेनचा त्रास टाळण्यासाठी, सर्वप्रथम ही डोकेदुखी किंवा हा त्रास नक्की कोणत्या कारणामुळे उद्भवतो आहे, हे पाहणे गरजेचे आहे. आपल्या खानपानाच्या वेळा व्यवस्थित सांभाळाव्या. जर दिवसभर बाहेर राहणार असाल, तर आपल्यासोबत चटकन तोंडात टाकता येतील असे खाद्यपदार्थ न्यावेत. दिवसातून अनेकदा थोडे थोडे खात राहावे. पाणी पिण्याचे प्रमाण योग्य असावे. डीहायड्रेशन मुळे देखील मायग्रेनचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे आपल्या आहारात पेयांचा भरपूर समावेश करा. यामध्ये ताज्या फळांचे किंवा भाज्यांचे रस, ताक, लस्सी, साधे पाणी या पेयांचा समावेश असावा.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment