हिमेश रेशमियाने केली आपल्या नव्या चित्रपटाची घोषणा


आपल्या संगीत आणि गायकीने प्रेक्षकांवर छाप पाडणारा बॉलिवूडची हिटमशीन हिमेश रेशमिया आता पुन्हा एकदा अभिनय क्षेत्रात सक्रिय झाला आहे. आत्तापर्यंत त्याचे १० चित्रपट रिलीज झाले आहेत. नुकताच त्याचा ‘हॅप्पी, हार्डी अँन्ड हिर’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. त्याची दुहेरी भूमिका या चित्रपटात पाहायला मिळत आहे. या चित्रपटानंतर त्याने आता त्याच्या आगामी चित्रपटाचीही घोषणा केली आहे.


आता ‘नमस्ते रोम’ या चित्रपटात हिमेश रेशमिया मुख्य भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट प्रेमकथेवरील सत्य घटनेवर आधारित असून प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांच्यासोबत एकत्र येऊन या चित्रपटासाठी हिमेश संगीत देणार आहे. तर, या चित्रपटाचे दिग्दर्शन राजेश सेठी हे करणार आहेत. हिमेशचा या चित्रपटातील एक लुक चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी सोशल मीडियावर शेअर करून या चित्रपटाबाबतची माहिती दिली आहे.

‘नमस्ते रोम’ चित्रपटाच्या शूटिंगला उन्हाळ्यामध्ये युनायटेड किंगडम म्हणजे इंग्लंड येथे सुरुवात होणार आहे. बॉलिवूडच्या एका आघाडीच्या अभिनेत्याची भूमिका देखील या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. अद्याप या अभिनेत्याचे नाव गुलदस्त्यात आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment