हृदयाच्या मजबुतीसाठी…


आपण आपल्या शरीरावर अनेक दबाव आणत असतो आणि त्याने कुरकुर करायला सुरूवात केली तर त्याकडे दुर्लक्ष करतो. त्याचा अपरिहार्य परिणाम आपल्यावर होतो पण नेमकेपणाने सांगायचे तर तो परिणाम आपल्या हृदयावर होत असतो. कारण शरीराला ओव्हरटाईम करावा लागला तर जादा रक्त पुरवावे लागते आणि ती जबाबदारी हृदयावर असते. आपल्या देशात बायकांना फार काबाडकष्ट करावे लागतात. त्यामुळे या देशातल्या ५० टक्के महिला या कोणत्याही क्षणी हृदयविकाराला बळी पडतील अशी शक्यता असते. ही शक्यता कमी करण्यासाठी काही गोष्टी जाणून घेतल्या पाहिजेत.

आपल्या हृदयावर चरबीचा परिणाम होत असतो. पण नेमकेपणाने सांगायचे तर परिणाम करणारी चरबी ही ट्रान्स फॅट म्हणवली जाते. आपल्याला चरबी वाढवणारे पदार्थ जाणून घेतले पाहिजेत आणि ते वर्ज्य केले पाहिजेत. ते फास्ट फूड, जंक फूड, बेकरी प्रॉडक्टस् आणि प्रक्रिया केलेले बाजारातले अन्न पदार्थ यात असतात. तेव्हा हे अन्नपदार्थ टाळले पाहिजेत. कारण, हे पदार्थ आपल्या शरीरात बॅड कोलेस्टेरॉल वाढवत असतात. या उलट गुड कोलेस्टेरॉल मात्र शरीराला हवे असते. आवश्यकही असते. म्हणून आपल्याला या दोन प्रकारातला भेद नीट समजला पाहिजे. आपण आता बैठी कामे करीत सुटलो आहोत आणि कायम एकाच जागेवर बसून कामे करायला लागलो आहोत. त्याचाही परिणाम हृदयावर होत असतो. यावर एक उपाय म्हणजे कितीही बैठे काम असले तरीही थोड्या थोड्या वेळाने उठावे आणि अंगाला आळोखे पिळोखे देऊन, थोडेसे चालून मग पुन्हा कामाला लागावे. त्यामुळेही हृदयावर पडणारा दबाव कमी होतो.

हृदयाचे विकार कमी करायचे असतील तर धूम्रपान करू नये हे तर खरेच पण आता असे सांगितले जात आहे की, सिगारेट पिणार्‍याच्या शेजारी बसणारांनाही हृदय विकाराचा संभव असतो. यालाच पॅसिव्ह स्मोकिंग असे म्हटले जाते. खरे पाहता दातांचा आणि हृदयाचा काही संबंध नाही. निदान आपल्याला तरी तसे वाटत असते पण तज्ज्ञांना वाटते की, दातांच्या आरोग्याचा आणि हृदयाच्या आजारांचा संबंध आहे. हृदयाची तंदुरुस्ती साधण्यासाठी दातांचीही चांगली काळजी घेतली पाहिजे. मुखरोग किंवा दातांचे विकार असतील तर खाण्यात काही गडबडी होतात आणि त्याचे परिणाम आपल्या हृदयाच्याआरोग्यावरही होतात. उच्च रक्तदाबाची तक्रार असल्यास आपल्या हृदयाचीही तब्येत बिघडण्याची शक्यता असते असे अमेरिकेत समजले जाते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment