मध्यरात्री अचानक झोपेतून जाग येते का? असू शकतील ही कारणे


रात्री अतिशय गाढ झोप लागलेली असताना मधूनच अचानक जाग येते. जाग नेमकी कोणत्या कारणाने आली हे काही केल्या समजत नाही, पण एकदा जाग आली की परत झोपही लागत नाही. हा अनुभव आपल्यापैकी प्रत्येकाने कधी ना कधी घेतलेला आहे. दिवसभराच्या धावपळीनंतर शरीराला विश्रांती आवश्यक असते. त्याकरिता रात्रीची झोप चांगली होणे अतिशय गरजेचे असते. जर रात्री झोप व्यवस्थित झाली नाही, तर पुढच्या दिवशी शरीरामध्ये कोणत्याही कामासाठी उत्साह रहात नाही.

काही लोकांना रात्रीच्या आठ ते नऊ तासांच्या झोपेची आवश्यकता असते, तर काही लोकांना चारपाच तासांची विश्रांतीसुद्धा पुरेशी असते. प्रत्येकाची झोपेची गरज वेगवेगळी असते. पण सर्वसाधारणपणे कोणत्याही प्रौढ व्यक्तीला दिवसाला सरासरी सात तासांची झोप आवश्यक असते. पण ह्या झोपेमध्ये जर काही कारणाने व्यत्यय आला, किंवा झोपमोड झाली, आणि ही झोप अपूर्ण राहिली, तर शरीराला आवश्यक ती विश्रांती मिळत नाही. एखादी व्यक्ती अगदी गाढ झोपेमध्ये असताना अचानक झोपमोड होण्यामागे काही कारणे आहेत असे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. ही कारणे कोणती ते जाणून घेऊ या.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आपण झोपत असताना आपल्या शरीराचे तापमान ६० ते ६७ डिग्री फॅरेनहाइट, म्हणजेच १५ ते १९ डिग्री सेल्सियस इतके असायला हवे. या पेक्षा तापमान कमी असेल, तर थंडीमुळे शरीरातील स्नायू आखडल्याची भावना होते, हातापायांमध्ये क्रॅम्प्स् येतात, किंवा थंडी वाजते आणि झोपमोड होते. जर शरीराचे तापमान १५ ते १९ डिग्री पेक्षा अधिक असेल, तर खूप घाम येणे, एकदम उकडणे, अस्वस्थ होणे असे प्रकार होऊन अचानक जाग येऊन झोपमोड होते.

आणखी एक कारण म्हणजे रात्री अनेकदा लघवीला जावे लागणे. याला वैद्यकीय भाषेमध्ये ‘ नॉकट्युरिया ‘ असे म्हटले गेले आहे. डायबेटीस, हार्मोन्सचे असंतुलन, किंवा मूत्राशयाशी निगडीत एखाद्या विकारामुळे हा विकार संभवतो. पण या मागचे सर्वात सामान्य कारण म्हणजे रात्री झोपण्यापूर्वी जास्त प्रमाणात पाणी पिणे. त्यामुळे रात्री झोपण्याच्या आधी जास्त पाणी पिणे टाळावे.

आपण राहतो त्या भागामध्ये जर सतत खूप वाहतूक असेल, तर येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांच्या आवाजाने किंवा हॉर्न्सच्या आवाजाने झोपमोड होऊ शकते. काही व्यक्तींची झोप इतकी हलकी असते, की घरामधील एखाद्या नळामधून गळणाऱ्या पाण्याच्या आवाजानेही त्यांची झोपमोड होत असते. अश्या व्यक्तींनी चांगल्या प्रतीच्या इयर प्लग्सचा वापर करावा. त्यामुळे बाहेरचे आवाज ऐकू येणे पूर्णपणे बंद होत नसले, तरी त्याचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

रात्री झोपण्याआधी मद्यपान केल्याने झोप येते अशी जरी सर्वसाधारण समजूत असली, तरी शास्त्रज्ञ मात्र हे चूक असल्याचे सांगतात. मद्यपान केल्याने लवकर झोप येत असली, तरी आपल्या शरीरामध्ये मद्याचे प्रोसेसिंग सुरु असते. ही प्रक्रिया आपल्या शरीराकरिता तणावपूर्ण असते. त्यामुळे मद्यप्राशन केल्यानंतर लागणारी झोप अस्वस्थ असते.

क्वचित कधीतरी गाढ झोपेत असताना अचानक श्वास गुदमरल्याची भावना होते. पन्नास वर्षे वयापेक्षा अधिक वय असणाऱ्या पुरुषांमध्ये ही समस्या जास्त आढळते. पण ही समस्या कोणाच्याही बाबतीत उद्भवू शकते. याला स्लीप अॅप्निया असे म्हटले जाते. यामध्ये श्वास अचानक गुदमरतो आणि मेंदूला पुरेसा प्राणवायू मिळत नाही. परिणामी एकदम जाग येते. झोपेमध्ये प्राणवायू न मिळाल्याने एकदम जाग येणे ही आपल्या शरीराची एक प्रकारची ‘ डिफेन्स मेकॅनिझम ‘, म्हणजेच बचावाची पद्धत म्हणता येईल.

मानसिक तणाव किंवा डिप्रेशनमुळेही स्वस्थ झोप लागत नाही. मानसिक तणावामुळे रात्री पडणारी विचित्र स्वप्ने, किंवा मनामध्ये सतत येणाऱ्या नकारात्मक विचारांमुळे अचानक झोपमोड होऊ शकते. जर असे घडत असेल, तर वेळीच तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. या साठी उपाय म्हणून बिहेवियर थेरपी, औषधोपचार, आणि निरनिराळी रीलॅक्सेशन टेक्निक्स वापरता येतात.

काही व्यक्तींना रात्री झोपल्यानंतर पाय किंवा पावलांमध्ये विचित्र संवेदना सुरु होतात. याला वैज्ञानिक भाषेमध्ये RLS किंवा रेस्टलेस लेग सिंड्रोम असे म्हटले गेले आहे. या विकारामध्ये झोपेमध्ये असताना पायांवर किडे चालत आहेत अशी भावना होणे, पाय दुखणे, किंवा स्नायू आखडणे अशी लक्षणे दिसत असून , या लक्षणांमुळे त्या व्यक्तीची झोपमोड होते. काहींना शरीराच्या इतर अवयवांमध्ये अश्या भावना होतात. अश्या वेळी झोपण्याआधी पायांना मालिश करणे, गरम पाण्याने स्नान करणे, आपण झोपत असू त्या खोलीतील तापमान नियंत्रित ठेवणे हे साधे पण प्रभावी उपाय करता येतील. जर ही व्याधी बळावली, तर डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य औषधोपचार घेणे इष्ट आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment