तुम्ही घेत असलेल्या ब्रॅन्डच्या लोगोचा अर्थ तुम्हाला माहित आहे का?


जगभरात ब्रॅन्डेड वस्तूंची मागणी वाढली असून त्या त्या ब्रॅन्डचे शोरूम्स जगातील वेगवेगळ्या शहरांमध्ये उभे राहिले. अलिकडे सर्वच तरूणांमध्ये आपल्या जवळ असलेल्या सर्वच वस्तू ब्रॅन्डेड असायला हव्यात हा अट्टाहास दिसून येतो. आपल्या वैशिष्ट्यमुळे अनेक ब्रॅन्ड प्रसिद्ध आहेत. तसेच त्यांचे लोगो सुद्धा प्रसिद्ध आहेत. काहीना काही अर्थ प्रत्येक बॅन्डच्या लोगोमध्ये दडलेला असतो. पण ब्रॅन्डेड वस्तूंचा अट्टाहास करत असताना तुम्ही घेत असलेल्या ब्रॅन्डच्या लोगोचा अर्थ तुम्हाला माहित असतो का ? नाही ना? तर मग काही ब्रॅन्डच्या लोगोंच्या कथा तुमच्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

टोयोटा – १९३३ साली किचिरो टोयोडा यांनी टोयोटा ह्या कंपनीची स्थापना केली होती. या कंपनीला संस्थापकांच्या नावात थोडा बदल करून नाव देण्यात आले आहे. ‘टोयोटा’ या गाडीच्या लोगोमध्ये आपल्याला तीन लंबवर्तुळ दिसतात. हे तीन लंबवर्तुळ दर्शवतात तीन हृदय. या तीन लंबवर्तुळामध्ये एक हृदय आहे ते ग्राहकाचं, दुसरे हृदय आहे प्रोडक्टचे आणि तिसरे हृदय टेक्नॉलॉजीच्या क्षेत्रातील या कंपनीच्या प्रगतीचे आहे.

मॅकडॉनाल्डस् – ‘एम’ फॉर मॅकडॉनल्ड बस्स एवढाच या लोगोचा अर्थ आहे. मॅकडॉनल्डसचा लोगो बदलण्याचा निर्णय ६०च्या दशकात मॅकडॉनल्डस् यांच्यातर्फ़े घेण्यात आला होता. पण लोगोतील गोल्डन आर्चेस तसेच राहू देण्याचा आग्रह ह्या लोगोचे कन्सलटंन्ट आणि सायकॉलॉजिस्ट लुईस चेस्किन यांनी धरला होता. बीबीसीने दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे म्हणणे होते की हा लोगो ग्राहकांना अनावधानाने “symbolism of a pair of nourishing breasts” सारखा भासतो. हे कितपत खरे आहे हे ते त्यांनाच माहिती पण मॅकडॉनल्डस्चा लोगो हा जगात सर्वात जास्त ओळखला जाणारा लोगो आहे. रिचर्ड आणि मॉरीस मॅकडॉनल्ड यांनी १९४०च्या दरम्यान ही कंपनी सुरू केली होती.

* बीएमडब्ल्यू – विमानउड्डाण क्षेत्राचा बीएमडब्ल्यू कंपनीला इतिहास आहे आणि त्यानुसारच या कंपनीचा लोगो कंपनीच्या इतिहासाची पाळेमुळे घट्ट धरून आहे. या लोगोमध्ये असलेला निळा रंग हा आकाशाचा आहे आणि पांढरा रंग हा विमानाच्या पंख्यासारखा आहे. म्हणजे जेव्हा विमानाचे पाते फिरत असतात तेव्हा त्या पात्यांमधून दिसणारे निळे आकाश. द्वितीय महायुद्धाच्या वेळी एक महत्वाची भूमिका बीएमडब्ल्यू या कंपनीने बजावली होती. जर्मन मिलिटरीसाठी बीएमडब्ल्यू कंपनीने विमानाची इंजने तयार करण्याचे महत्वाचे काम केले होते. फ्रॅन्झ जोसेफ पॉप यांनी ही कंपनी जर्मनीत १९६१ साली सुरू केली होती.

* अ‍ॅपल – आपल्या वेगवेगळ्या प्रॉडक्ट्ससाठी अ‍ॅपल ही कंपनी प्रसिद्ध असून बायबल मधील अ‍ॅडम आणि इव्ह यांच्या कथेत असलेल्या ‘ट्री ऑफ नॉलेज’ मधून वगळण्यात आलेल्या फळाचे प्रतिनिधीत्व अ‍ॅपल कंपनीचा लोगो करतो. १९७७ साली कॅलिफोर्निया येथे स्टिव्ह जॉब्स आणि स्टिव्ह वॉझनियाक यांनी ही कंपनी सुरू केली. एकूण ३१७ उत्पादनांचे पेटंट स्टिव्ह जॉब्स यांच्या नावावर आहे. त्यांनी आयपॉड आणि त्याच्याशी संबंधित ८५ उत्पादनांची निर्मिती केली आहे. लॅपटॉप, आयपॅड, आयपॉडपासून अ‍ॅपल टीव्हीपर्यंत जॉब्स यांच्या पोतडीतून अतिसुलभ आणि वेगवान उत्पादने तयार होत आहेत.

फेडएक्स – कुरिअरच्या क्षेत्रातली फेडऎक्स ही एक अग्रगण्य कंपनी असून अतिशय वेगळा आणि आकर्षक असा फेडऎक्स या कंपनीचा लोगो आहे. हा लोगो दिसताना फक्त या कंपनीचे नाव दिसते. पण जर तुम्ही निरक्षण करून या लोगोकडे पाहिले तर तुमच्या लक्षात येईल की ‘ई’ आणि ‘एक्स’ या दोन शब्दांच्या मधे एक अ‍ॅरो दिसतो. हा अ‍ॅरो कंपनीच्या पुढे नेणा-या विकसित विचारांना आणि भविष्याकडे कंपनीचा बघण्याचा दृष्टिकोन दर्शवतो. १९७३ सालापासून ही कंपनी आपली सेवा पुरवत आहे. ही कंपनी फेडरीक स्मिथ यांनी सुरू केली असून त्यांच्या नावातील फेड कंपनीच्या लोगोत आला आहे.

* मर्सिडिज बेन्झ – सर्वांनाच मर्सिडिज-बेन्झ ही गाडी भूरळ घालणारी आहे. ही गाडी जेवढी आकर्षक आहे तेवढाच या कंपनीचा लोगो सुद्धा आकर्षक आहे. यात दिसत असलेले तीन स्टार हे कंपनी पुरवित असलेल्या क्लॉलिटीतील वर्चस्व आणि सोबतच जमिन, समुद्र आणि हवा यांचीही स्टाईल दर्शवतात.

* गुगल- जगात सर्वात जास्त वापरले जाणारे गुगल हे सर्च इंजिन आहे हे काही वेगळं सांगायला नको. गुगलच्या लोगो मध्ये पाठोपाठ प्राथमिक रंगसंगती वापरण्यात आली आहे आणि नंतर दुय्यम रंग वापरण्यात आला आहे. यात जाणिवपूर्वक रंगांचा हा मेळ करण्यात आला असून गुगलला यातून हे दर्शवायचे आहे की त्यांनी लोगो बनवण्यासाठी कोणतेही नियम आखले नाहीत. लोगो कशाप्रकारेही अवाढव्य किंवा समजण्यास कठीण नाही. हेच दर्शवण्यासाठी गुगलच्या लोगोमध्ये सरळ शब्द आणि रंग वापरण्यात आले आहेत.

* आदिदास – तरूणाईमध्ये आदिदास या अतिशय लोकप्रिय असलेल्या ब्रॅन्डचा लोगो हा डोंगरासारखा वाटतो. हा लोगो डोंगर मार्गातील अडथळा भासवतो लोकांना ज्या अडथळ्यांवर मात करायची आहे. पण खरतर आधीच्या लोगोमध्ये फक्त तीन स्ट्रीप्स दिल्या होत्या. या लोगोमध्ये फार काही अर्थ नव्हता. त्यांनी नंतर फक्त हे तीन स्ट्रीप्स डोंगरासारखे तिरपे दिसतील या पद्धतीने दर्शवले आहेत. आदिदास ही जर्मनीची कंपनी असून अ‍ॅडॉल्फ डॅसलर यांनी १९४८ साली या कंपनीची स्थापन केली. त्यांच्याच नावातील आणि आडनावातील शब्द कंपनीच्या नावात समाविष्ट करण्यात आले आहेत.

* एनबीसी – मोराला इतके रंग कसे आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का ? याचे कारण हे की ‘एनबीसी’ची मालकी ५० च्या दशकात ‘आरसीए’कडे होती. आणि नुकतीच त्यांनी रंगीत टिव्हींची निर्मिती करायला सुरूवात केली होती. त्या काळात जास्त लोक हे ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टिव्हीच बघायचे. त्यांना दिसते ती वस्तू किंवा प्राणी कलरफुल असूनही ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईटच दिसत होती. ‘आरसीए’चे म्हणणे असे होते की ब्लॅक अ‍ॅन्ड व्हाईट टिव्ही बघणा-यांना लोकांना हे कळावे की ते काय काय मिस करीत आहेत. म्हणून त्यांनी एवढा कलरफुल लोगो तयार केला.

* ऑडी – जगभरात प्रसिद्ध असलेल्या गाड्यांची ही आणखी एक कंपनी ऑडी आहे. या कंपनीच्या गाड्या भारतातही मोठ्याप्रमाणात लोकप्रिय आहेत. अगदी साधा आणि सरळ या कंपनीचा लोगो दिसतो. पण याचा अर्थ लगेच कुणाच्या लक्षात येत नाही. चार गोलांची साखळी या लोगोमध्ये दाखवण्यात आली आहे. हे चार गोल ‘ऑटो युनियन कॉन्सोर्टियम’ मधील चार संस्थापक कंपनींचे आहेत. त्यात ‘डिडब्ल्यूके’, ‘हॉर्च’, ‘वंडरर’ आणि ‘ऑडि’ यांचा समावेश आहे. १९३२ साली ऑगस्ट हॉर्च यांनी जर्मनीमध्ये ह्या कंपनीची स्थापना केली.

* वोल्क्सवॅगन – जगभरात आपल्या आकर्षक गाड्यांसाठी व्होल्क्सवॅगन ही कंपनी प्रसिद्ध आहे. व्होल्क्सवॅगन ही एक जर्मन कंपनी असून या कंपनीच्या लोगोमध्ये ‘V’ आणि ‘W’ हे दोन शब्द प्रखरपणे दिसतात. यातील ‘V’ चा अर्थ आहे ‘Volks’ म्हणजेच लोक, जर्मनीतील लोक आणि ‘W’ चा अर्थ आहे “Wagen” म्हणजेच कार. एकुणच काय तर लोकांसाठीची कार असा या लोगोचा अर्थ आहे. या कंपनीची सुरूवात १९३७ साली जर्मनी येथून झाली आहे.

* अ‍ॅमेझॉन – ऑनलाईन खरेदीच्या जगातील अ‍ॅमेझॉन ही एक अग्रगण्य वेबसाईट म्हणून प्रसिद्ध आहे. जर का आपण या साईटचा लोगो निरीक्षण करून पाहिला तर आपल्याला अ‍ॅमेझॉन या शब्दाखाली एक अ‍ॅरो दिसतो. हा अ‍ॅरो एका स्माईली सारखाही भासतो. त्यावरून असे वाटते की अ‍ॅमेझॉन आपल्या ग्राहकांना आनंदी ठेवतात असा एक अर्थ निघतो. पण असा याचा अर्थ नसून हाच अ‍ॅरो आणखी निरीक्षण करून पाहिला तर तो अ‍ॅमेझॉन शब्दातील ‘a’ पासून सुरू होऊन ‘Z’ या शब्दावर रोखण्यात आला आहे. याचा अर्थ असा की, अ‍ॅमेझॉन या कंपनीकडे ग्राहकांना खरेदी करण्यासाठी ‘A’ to ‘Z’ वस्तू आहेत. ह्या कंपनीची सुरूवात फक्त पुस्तकांची ऑनलाईन विक्री करण्यापासून झाली होती. जेफ बेझोस यांनी १९९४ साली ही वेबसाईट सुरू केली.

Leave a Comment