पाचव्या टी-२०सह टीम इंडियाचा ऐतिहासिक मालिका विजय


नवी दिल्ली – टीम इंडियाने नवीन वर्षाच्या पहिल्याच परदेश दौऱ्यात इतिहासाची नोंद केली आहे. टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध अखेरच्या टी-२० सामन्यात ७ धावांनी विजय मिळवत न्यूझीलंडला व्हाईटवॉश दिला आहे. भारतीय संघाची न्यूझीलंडच्या भूमीवर अशी कामगिरी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. विजयासाठी भारताने दिलेले १६४ धावांचे आव्हान यजमान संघाला पेलवले नाही. रॉस टेलर आणि टीम सेफर्ट यांनी अर्धशतक झळकावत न्यूझीलंडला विजया प्रयत्न नेण्याचे चांगले प्रयत्न केले, पण भारतीय गोलंदाजांनी मोक्याच्या क्षणी सामन्यात पुनरागमन करत न्यूझीलंडची विजयाची संधी हिरावून घेतली.

सामन्याची सुरुवात भारतीय गोलंदाजांनी आक्रमक पद्धतीने केली. न्यूझीलंडचे आघाडीचे ३ फलंदाज अवघ्या १७ धावांत माघारी परतले होते. पण टीम सेफर्ट आणि रॉस टेलर यांनी यानंतर चौथ्या विकेटसाठी ९९ धावांची भागीदारी रचत सामन्याचे पारडे आपल्या बाजूने फिरवले. भारतीय गोलंदाजांवर या दोन्ही फलंदाजांनी हल्लाबोल चढवत, भारतीय गोटात चिंतेचे वातावरण निर्माण केले. दोन्ही फलंदाजांनी शिवम दुबेच्या गोलंदाजीवर तर तब्बल ३४ धावा कुटल्या. पण सेफर्टला माघारी धाडत नवदीप सैनीने न्यूझीलंडची जमलेली जोडी फोडली.

अर्धशतकवीर सेफर्ट माघारी परतल्यानंतर, नेहमीप्रमाणेच न्यूझीलंडच्या अखेरच्या फलंदाजांनी निराशा केली. एकामागोमाग एक विकेट फेकत न्यूझीलंडने सोपे आव्हान कठीण करुन ठेवले. एका बाजूने बाजू सांभाळत टेलरने आपले अर्धशतक झळकावले. पण तो देखील सैनीच्या गोलंदाजीवर माघारी परतला. शार्दुल ठाकूरच्या अखेरच्या षटकात इश सोधीने दोन षटकार खेचत सामन्यात रंगत आणली होती. पण न्यूझीलंडच्या शेपटाला भारतीय गोलंदाजांनी फारसे वळवळण्याची संधी न देता संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. भारताकडून जसप्रीत बुमराहने ३, नवदीप सैनी-शार्दुल ठाकूरने प्रत्येकी २-२ तर वॉशिंग्टन सुंदरने एक बळी घेतला.

Leave a Comment