World Record ; 65 वर्षीय महिलेच्या पायाला 19 तर हाताला 12 बोटे


गंजम – गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये ओडिशामधील गंजम जिल्ह्यातील कडापाड गावातील एका 65 वर्षीय महिलेचे नाव नोंदवण्यात आले आहे. या महिलेचे नाव कुमारी नायक असे असून या महिलेच्या पायाला 19 आणि हाताला 12 बोटे असल्यामुळे गिनीज बुकात तिचे नाव नोंदवण्यात आले आहे. असे पॉलीडेक्टॅलिझम रोगामुळे होते. तज्ञांनुसार, असा असामान्य डिसऑर्डर गर्भधारणेच्या 6 ते 7 व्या आठवड्यात आढळतो. सामान्यांपेक्षा जास्त बोटे महिलेच्या हातापायाला असल्यामुळे शेजारी तिला घाबरतात.

कुमारी नायक हात आणि पायात 31 अंगठे आणि बोटे असणारी जगातील पहिली महिला बनली आहे. यासोबत कुमारी नायकने गुजरातच्या 47 वर्षीय देवेंद्र सुधार यांचा विक्रम मोडला आहे. देवेंद्र यांच्या हातापायाला 14-14 बोटे आहेत. 2014 मध्ये देवेंद्र यांचा हा विक्रम बनला होता. नायक कुमारीच्या मते, या दोषामुळे मी जन्माला आले आणि गरीब असल्यामुळे यावर उपचार घेऊ शकत नाही. लोकांपासून दूर राहता यावे यासाठी मी अधिक वेळ घरातच राहते. कुमारी नायकच्या शेजाऱ्याने सांगितले की, हे एक छोटे गाव असून येथील लोक अंधश्रद्धेच्या विळख्यात आहेत. कुमारी यांच्यावर उपचार करता येतील अशी त्यांची आर्थिक स्थिती नाही.

याबाबत माहिती देताना सर्जिकल तज्ञ डॉ.पिनाकी मोहंती यांनी सांगितले की, कुमारी नायक पॉलीडेक्टली असून त्या असामान्य नाही. 5 हजार लोकांमध्ये एक किंवी दोन जणांना अतिरिक्त बोटे असतात. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मते, कुमारी नायक यांना घर देण्याची सोय करण्यात आली आहे. पेंशनसह इतर मदत सुद्धा त्यांना दिली जात आहे. आसपासच्या लोकांना कुमारी यांची भीती वाटू नये यासाठी त्यांना जागरूक केले जात आहे.

Leave a Comment