बँक बुडाली तरी खातेधारकांना ठेवींवर मिळणार ५ लाखांचे विमा संरक्षण


नवी दिल्ली : कोट्यवधी बँक खातेदारांसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वात मोठी घोषणा केली. सीतारमण यांनी विविध घोटाळयांमुळे धास्तावलेल्या बँक ग्राहकांना दिलासा दिला. आज अर्थसंकल्पात त्यांनी बँक खात्यातील रकमेवरील विमा कवच ५ लाखांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. हा निर्णय सर्वसामान्य खातेदारांसाठी फायदेशीर ठरणार आहे. सध्या बँकामधील ठेवीवर ठेवीदाराला एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते.

सध्या बँकामधील ठेवीवर ठेवीदाराला डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडीट ग्यारंटी कॉर्पोरेशनच्या माध्यमातून एक लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाते. पण बँकांमध्ये अनेक बडे घोटाळे मागील काही वर्षांत झाले असून सामान्य ठेवीदारांना त्यात मोठी झळ बसली.

लाखो ठेवीदार नुकत्याच सहकार क्षेत्रातील पीएमसी बँकेच्या घोटाळ्याने भरडले गेल्याने ठेवींवरील त्रोटक विमा संरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अर्थसंकल्पात बँकांमधील आर्थिक घोटाळ्यांमुळे भरडणाऱ्या सामान्य ठेवीदारांचे हित जपण्याच्यादृष्टीने ठेवींवरील विमा संरक्षण पाच लाखांपर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली. ‘एसबीआय’च्या सर्वेक्षणानुसार ६१ टक्के ठेवी या एक लाखांच्या अंतर्गत असल्यामुळे विमा कवच वाढवण्याची मागणी करण्यात येत होती.

Leave a Comment