अर्थसंकल्प 2020 : कररदात्यांना दिलासा, अशी आहे नवी कर रचना


नवी दिल्ली : आर्थिक वर्ष 2020-21च्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नव्या कर रचनेची घोषणा केली आहे. त्यानुसार कोणताही दिलासा 2.5 लाख ते 5 लाख रुपये उत्पन्न असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी मिळालेला नाही. आधीप्रमाणेच 5 टक्के कर या उत्पन्न गटातील करदात्यांना भरावा लागणार आहे. पण 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न आधीप्रमाणेच करमुक्त घोषित करण्यात आले आहे.

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केल्याप्रमाणे मागील वर्षीप्रमाणेच याहीवर्षी 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त आहे. 2.5 लाख ते 5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 5 टक्के कर लागणार आहे. यानंतर 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 10 टक्के कर असेल. या कररचनेची घोषणा होण्याआधी 5 लाख ते 7.5 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के कर होता.

7.5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 15 टक्के कर द्यावा लागणार आहे. हा आधी 20 टक्के होता. 10 लाख ते 12.5 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावरील 30 टक्के कर आता 20 टक्के करण्यात आला आहे. 12.5 लाख ते 15 लाख रुपये उत्पन्नापर्यंत 30 टक्क्यांऐवजी 25 टक्के कर आकारण्यात येईल.

Leave a Comment