अर्थसंकल्प 2020 : तब्येत बिघडल्यामुळे अर्थमंत्र्यांनी आटोपते घेतले भाषण


नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर केला. पण, सीतारमण यांची अर्थसंकल्पाचे वाचन करत असताना मध्येच तब्येत बिघडली. हे लक्षात आल्यानंतर अर्थमंत्री सीतारमण यांना बसण्यास सांगण्यात आले. भाषण सुरू असताना अर्थमंत्र्यांचा रक्तदाब कमी झाल्याचे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे.

आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा दुसरा अर्थसंकल्प आहे. याबरोबरच, त्यांचे आजचे भाषण हे त्यांनी या पूर्वी केलेल्या भाषणाहून मोठे होते. म्हणजेच भाषणाचा स्वत:चाच विक्रम त्यांनी मोडला आहे. पण, तब्येत बिघडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी आपले भाषणमध्येच थांबवले.

दोन तास, १७ मिनिटे भाषण गेल्या वर्षी निर्मला सीतारमण यांनी केले. त्यांनी यंदा आपले भाषण २ तास ४१ मिनिटांवर थांबवले. सीतारमण यांचे भाषण सुरू असताना त्यांना अस्वस्थ वाटून घाम आला असे वृत्त वृत्तसंस्थेने दिले आहे. पण, आपली भाषणाची फक्त दोनच पाने वाचायची शिल्लक राहिली अशी माहिती सीतारमण यांनी लोकसभेत दिली. दरम्यान लोकसभेचे कामकाज ३ फेब्रुवारीपर्यंत स्थगित करण्यात आले आहे.

Leave a Comment