अर्थसंकल्प 2020 : आधार कार्ड असल्यास त्वरित मिळणार पॅन क्रमांक


नवी दिल्ली: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी अर्थसंकल्प सादर करताना, तुमच्याकडे आधार क्रमांक असेल तर, तुम्हाला त्वरित पॅन क्रमांक मिळेल यासंदर्भातील नव्या व्यवस्थेची घोषणा केली. ‘आधार’ असेल तर, त्याआधारे ऑनलाइन पद्धतीने तात्काळ पॅन क्रमांक मिळेल. कोणताही अर्ज त्यासाठी भरण्याची आवश्यकता नसल्याचे सीतारामन यांनी सांगितले.

निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्प सादर करताना ‘आधार’द्वारे करदात्यांची पडताळणीही सुरू करण्यात येणार असल्याचे सांगितले. करदात्यांना सोयीस्कर व्हावे यासाठी लवकरच नवी यंत्रणा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. ‘आधार’द्वारे तात्काळ ऑनलाइन पॅन क्रमांक दिला जाईल. त्यासाठी अर्ज भरण्याची गरज भासणार नाही.

आयकर कायद्यानुसार, आयकर परताव्यावेळी कोणत्याही व्यक्तीला आपल्या आधार क्रमांकाचा उल्लेख करणे आवश्यक आहे. ३१ मार्च २०२० पर्यंत पॅन आणि आधार क्रमांक जोडणी करणे बंधनकारक आहे. आयकर परतावा करण्याव्यतिरिक्त बँक खाते उघडणे आणि आर्थिक देवाण-घेवाण यासाठी पॅन कार्ड आवश्यक आहे.

Leave a Comment