४२ कोटींची जाहिरात करून कुत्र्याला जीवदान देणाऱ्या डॉक्टरला धन्यवाद


फोटो सौजन्य भास्कर
आपल्या जिवलग कुत्र्याला कॅन्सरमुक्त करून त्याला जीवदान देणाऱ्या डॉक्टर्सना धन्यवाद देण्यासाठी अमेरिकन कार एक्सेसरीज कंपनी वेदरटेकचा सीईओ डेव्हिड मेक्नील याने चक्क ६० लाख डॉलर्स म्हणजे ४२.३८ कोटी रुपये जाहिरातीवर खर्च केले आहेत. या जाहिरातीचे प्रसारण सुपर बाऊल टुर्नामेंटमध्ये केले जात आहे. ही नॅशनल फुटबॉल लीगची वार्षिक चँपियनशिप अमेरिकेत प्रचंड लोकप्रिय आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मेक्नीलचा पाळीव कुत्रा स्काऊट याच्या हृदयात ट्युमर झाल्याचे एक वर्षापूर्वी लक्षात आले. हा कॅन्सर होता. स्काऊट घरात एका खोलीत बसून असे आणि मालकाकडे पाहून दीनवाणेपणाने शेपूट हलवीत असे. मेक्नीलचा हा आवडता कुत्रा असाच मरून जाऊ नये म्हणून त्याने जून २०१९ मध्ये त्याच्यावर वेटरनरी रुग्णालयात ऊपचार सुरु केले. त्याच्यावर किमो, रेडीएशन, इम्युनोथेरपी असे सर्व उपचार केले गेले आणि डॉक्टर्सनी सप्टेंबर मध्ये त्याचा ट्युमर ९० टक्के कमी झाल्याचे जाहीर केले.

ट्युमर कमी होताच स्काऊटची तब्येत एकदम सुधारली आणि उरलासुरला ट्युमरही नष्ट झाला. उपचार करणाऱ्या डॉक्टर्सचे आभार मानण्यासाठी आणि प्राण्यांमधील कॅन्सर बद्दल जनजागृती करण्यासाठी मेक्नीलने सुपर बाऊल स्पर्धेत जाहिरात देण्याचे ठरविले. या जाहिरातीतून त्याने पाळीव प्राणी आजारावर संशोधनासाठी लोकांनी दान करावे असे आवाहनही केले आहे.

Leave a Comment