१०० वर्षापूर्वी बर्मुडा ट्रँगल मधील बेपत्ता जहाजाचे अवशेष मिळाले


फोटो न्युयॉर्क पोस्ट
डेव्हील ट्रँगल किंवा बर्मुडा ट्रँगल या नावाने कुपरिचित असलेल्या समुद्री भागात १०० वर्षापूर्वी अचानक गायब झालेल्या एका व्यापारी जहाजाचे अवशेष एक तज्ञ गटाला सापडले आहेत. हे अवशेष कोटो पॅक्सी या व्यापारी जहाजाचे असल्याचे पुरावे मिळाले असून हे वाफेच्या इंजिनाचे जहाज २९ नोव्हेंबर १९२५ रोजी त्याच्या नियोजित प्रवासावर रवाना झाले होते. मात्र दोन दिवसातच बर्मुडा ट्रँगल भागातून ते अचानक गायब झाले होते आणि त्यावेळी जहाजाच्या कप्तानाने धोक्याचा संदेश पाठवून दिशा चुकली असल्याचे कळविले होते.

या जहाजाचा मार्ग चार्ल्सटन वरून क्युबातील हवाना असा होता आणि त्या जहाजावर ३२ प्रवासी होते. ते गायब झाले त्यानंतर जहाज अथवा त्यावरील प्रवासी यांचा काहीच पत्ता मिळू शकला नव्हता. अलीकडेच अंडरवॉटर एक्सप्लोरर आणि मेरीटाइम अर्किओलोजिस्ट यांना मिळालेल्या जहाजाच्या मलब्यावरून या गायब झालेल्या जहाजावर प्रकाश पडला आहे. हे जहाज सेंट ऑगस्टिन भागात गायब झाले होते.

मरिन बायोलोजिस्ट मायकेल बार्नेट यांनी ब्रिटीश इतिहास तज्ञ गाय वॉल्टर्स याच्या मदतीने या जहाजाची माहिती शोधून काढली. त्यानुसार प्रवासाला निघाल्यावर दोन दिवसात जहाजाकडून धोक्याचा संदेश आल्याचे व तोच शेवटचा संदेश असल्याचे दिसून आले.

उत्तर अटलांटिक समुद्रातील फ्लोरिडाचा काही भाग, प्यूतो रिको आणि बर्म्युडा हा भलामोठा त्रिकोण बर्मुडा ट्रँगल या नावाने कुप्रसिद्ध असून येथे शेकडो वर्षे रहस्यमय रित्या अनेक विमाने, जहाजे गायब झाली आहेत. त्या पैकी अनेकांचा शोध आजही लागू शकलेला नही. या ट्रँगलचे रहस्य आजही कोडे बनून राहिले असून आता कोटो पॅक्सीचे अवशेष सापडल्यामुळे हे रहस्य उलगडू शकेल काय याची उत्सुकता वाढली आहे.

Leave a Comment