सलग दुसऱ्यांदा सुपर ओव्हरमध्ये भारताची न्यूझीलंडवर मात

वेलिंग्टन येथे पार पडलेल्या चौथ्या टी20 सामन्यात पुन्हा एकदा भारताने सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडचा पराभव केला आहे. या पराभवासह भारताने 5 टी20 सामन्यांच्या मालिकेत 4-0 अशी आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या सामन्यात देखील भारताने सुपर ओव्हरमध्ये विजय मिळवत मालिकेत आघाडी घेतली होती. याच विजयाची पुनरावृत्ती भारताने आजच्या सामन्यात केली. भारताच्या 165 धावांचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा संघ देखील 165 धावाच करू शकला.

सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडकडून कॉलिन मुन्रो आणि  टिम सेफ सेफर्ट उतरले होते. भारताकडून बुमराहने सुपर ओव्हरमध्ये गोलंदाजी केली. सुपर ओव्हरमध्ये न्यूझीलंडने टिन सेफर्टची विकेट गमावत 13 धावा केल्या होत्या. यानंतर भारताकडून विराट आणि केएल राहूल ही जोडी मैदानात उतरली. तर न्यूझीलंडकडून साउदीने गोलंदाजी केली. पहिल्याच चेंडूवर षटकार व दुसऱ्या चौकार मारत केएल राहुलने भारताला विजयाच्या जवळ नेऊन ठेवले. तिसऱ्या चेंडूवर केएल राहूल बाद झाल्यानंतर अखेर विराटने चौथ्या चेंडूवर 2 धावा आणि 5व्या चेंडूवर चौकार ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

त्याआधी प्रथम फलंदाजी करताना भारताने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावत 165 धावा केल्या. भारताकडून मनीष पांडेने 36 चेंडूमध्ये 3 चौकारांच्या सहाय्याने 50 धावांची महत्त्वपुर्ण खेळी केली. केएल राहुलने 39 धावा, विराट कोहलीने 11 धावा आणि शार्दुल ठाकूरने 20 धावा केल्या. न्यूझीलंडकडून सोधीने 3, बेनेथने 2 आणि साउदी, स्कॉट सँथनरने प्रत्येक 1 विकेट घेतली.

धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने देखील 20 ओव्हरमध्ये 7 विकेट्स गमावत 165 धावा केल्या. न्यूझीलंडकडून मुन्रो 64 धावा आणि सेफर्टने 57 धावांची अर्धशतकीय खेळी केली. भारताकडून शार्दुल ठाकुरने सर्वाधिक 2 तर सैनी आणि बुमराहने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

दोन्ही संघांमधील 5वा व अखेरचा टी20 सामना 2 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे.

Leave a Comment