आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लबशी करारबद्ध होणारी ही पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू

भारतीय महिला फुटबॉल संघासाठी सर्वाधिक गोल करणारी बाला देवी आंतरराष्ट्रीय फुटबॉल क्लबसाठी निवडली गेलेली पहिली भारतीय महिला फुटबॉलपटू ठरली आहे. भारतीय संघाकडून फॉरवर्ड पोजीशनमध्ये खेळणाऱ्या बाला देवीने स्कॉटलँडचा क्लब रेंजर्स एफसीसोबत 18 महिन्यांचा करार केला आहे.

एकेकाळी बाला देवीला गावातील मुलांबरोबर सराव करावा लागत असे. कारण तिच्याकडे काहीही पर्याय नव्हता. गावातील लोक मुलींना हा खेळ खेळण्यास मनाई करत असे. मात्र आज आपल्या मेहनतीच्या जोरावर तिने आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव कमवले आहे.

याविषयी बोलताना तिने सांगितले की, या संघाशी 18 महिन्याचा करार झाला असून, मी त्यांच्यासाठी खेळण्यास उत्सुक आहे. मी त्यांच्यासाठी 10 क्रमांकाच्या जर्सीत खेळेल. भारतीय संघात माझ्या जर्सीचा क्रमांक देखील हाच आहे.

आपल्या या कामगिरीमुळे अन्य भारतीय महिला फुटबॉलर्ससाठी अनेक मार्ग उघडतील. यामुळे तरुण खेळाडूंना प्रेरणा मिळेल, असे तिला वाटते.

बाला देवी सध्या भारतीय महिला फुटबॉल संघाकडून सर्वाधिक गोल करणारी खेळाडू आहे. 15 वर्षांची असताना भारतीय संघात स्थान मिळवणाऱ्या बाला देवीने आतापर्यंत 58 सामन्यात 52 गोल केले आहेत. यासोबत दक्षिण आशिया भागात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय गोल करणारी देखील ती महिला फुटबॉलर आहे.

स्थानिक फुटबॉल सामन्यात तिने अनेक विक्रम केले आहेत. तिने 120 स्थानिक सामन्यात 100 पेक्षा अधिक गोल केले आहेत. वर्ष 2015 आणि 2016 मध्ये तिला अखिल भारतीय फुटबॉल महासंघाकडून सर्वोत्तम महिला खेळाडू म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.