बजाज ऑटोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून राहुल बजाज पायउतार


बजाज ऑटोच्या कार्यकारी अध्यक्षपदावरून राहुल बजाज ३१ मार्च २०२० रोजी पायउतार होत आहेत. ७५ वर्षीय राहुल बजाज त्यानंतर मानद कार्यकारी संचालक म्हणून काम पाहणार आहेत. मात्र कंपनीच्या निर्णयात त्यांचा थेट सहभाग नसेल. या पदावर ते १ एप्रिल २०२० पासून रुजू होणार असून त्यासाठी सेबीच्या नियमानुसार पोस्टल बॅलट मधून कंपनीच्या भागधारकांची मंजुरी घेतली जाणार आहे.

कार्यकारी अध्यक्षपदावर राहुल बजाज यांची २०१५ मध्ये नियुक्ती झाली होती. पाच वर्षानंतर त्यांनी कंपनीचे पूर्णवेळ संचालक म्हणून काम न करण्याचा निर्णय जाहीर केला होता. कंपनीच्या संचालक बोर्डाने त्यांच्या नॉन एग्झीक्यूटीव्ह पदासाठी मंजुरी दिली असल्याचे कंपनीने गुरुवारी स्पष्ट केले आहे.

१९६५ पासून राहुल बजाज बजाज ग्रुपची जबाबदारी सांभाळत आहेत. त्याच्या कार्यकाळात कंपनीची उलाढाल ७.२ कोटींवरून १२ हजार कोटींवर पोहोचली. देशातील अग्रणी स्कुटर कंपनी अशी बजाज ऑटोची ओळख आहे. २००५ मध्ये राहुल बजाज यांनी व्यवस्थापकीय संचालकाची जबाबदारी मुलगा राजीव बजाज यांच्यावर सोपविली होती.

Leave a Comment